भात शेतीवर साकारला ‘कृष्ण गरूड’; इंगळहळीकर यांचा सलग सातव्या वर्षी उपक्रम | पुढारी

भात शेतीवर साकारला ‘कृष्ण गरूड’; इंगळहळीकर यांचा सलग सातव्या वर्षी उपक्रम

पुणे; पुढारी वृत्तसेवा: निसर्गाच्या कुशीत अनेक प्राणी, पक्षी, जीव राहतात. मात्र, त्यांचेच चित्र निसर्गाच्या ‘कॅन्व्हास’वर चितारण्याचा अनोखा प्रयोग हौशी वनस्पतीतज्ज्ञ श्रीकांत इंगळहळीकर हे 2016 पासून करत आहेत. यंदा सातव्या वर्षी त्यांनी ‘पॅडी आर्ट’ अर्थात भातशेतीच्या माध्यमातून भव्य चित्र साकारण्याच्या शैलीत ‘कृष्ण गरूड’ अर्थात ‘ब्लॅक ईगल’ ही चित्रकृती सादर केली आहे.
भरारी घेतलेल्या गरुडाचे हे चित्र हिरव्या- काळ्या भातरोपांच्या लावणीतून तयार केले आहे.

कृष्ण गरूड सह्याद्रीच्या सर्वोच्च माथ्यावरच्या सदाहरित जंगल उतारांवर दिसतो. पिवळी चोच आणि पाय याखेरीज या गरुडाची पिसे काळी असतात. झाडांलगत तरंगत पक्षी, साप, खारी अशी भक्ष्ये शोधताना दिसतो. भिमाशंकर, माथेरान, महाबळेश्वर, आंबोली या दाट जंगलांवर काळ्या रंगामुळे आणि घुटमळत तरंगण्याच्या सवयीमुळे सहज ओळखता येतो. पावसाळ्यात ढगांमुळे त्याला भक्ष्य दिसत नसल्याने कमी पावसाच्या डोंगरांवरही दिसतो. यावर्षी साकारलेला ‘कृष्ण गरूड’ हा सुमारे 80 फुटांचा आहे.

सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यातील पानाफुलांच्या संशोधनासाठी प्रसिद्ध असलेले पुण्यातील इंगळहळीकर यांच्या प्रयत्नांतून सिंहगड रस्त्यावरील गोर्‍हे बु. येथे ही कलाकृती साकारली आहे. सिंहगड रस्त्यावर डोणजे गावाच्या थोडे अलीकडे असलेल्या पेट्रोल पंपाजवळील लेक्सॉन वाइंडर्स येथे बघायला मिळू शकते. व्यवसायाने उद्योजक असलेल्या इंगळहळीकर यांनी जपानमधील हे ‘पॅडी आर्ट’ प्रथमच पुण्यात आणले. ‘पॅडी आर्ट’ साकारताना जमिनीचा एका ‘कॅन्व्हास’सारखा वापर केला जातो आणि विविध रंगातील भाताची रोपे लावून रंगसंगती साधली जाते. पावसात दोन रंगांच्या भातपिकाची पेरणी करणे हे आव्हानात्मक असल्याचे इंगळहळीकर यांनी नमूद केले.

‘पॅडी आर्ट’ या कलेविषयी…
दक्षिण जपानमधील ओमोरी जिल्ह्यात असलेले इनाकादाते या गावात ‘पॅडी आर्ट’चा जन्म झाला. काही वर्षांपूर्वी भातशेतीला दोन हजार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तेथील शेतकर्‍यांनी उत्सव साजरा करण्याचे ठरवले आणि त्यातून ‘पॅडी आर्ट’ अर्थात ‘टॅम्बो अटा’ ही कला 1993 मध्ये जपानमध्ये लोकप्रिय झाली.

 

Back to top button