वाहनांच्या सात किलोमीटरपर्यंत रांगा; मुंबई-बंगळुरू महामार्गावरील चित्र | पुढारी

वाहनांच्या सात किलोमीटरपर्यंत रांगा; मुंबई-बंगळुरू महामार्गावरील चित्र

धायरी; पुढारी वृत्तसेवा: वडगाव, वारजेदरम्यान असलेल्या मुठा नदी पुलावर कंटेनर बंद पडल्याने गुरुवारी मुंबई- बंगळुरू महामार्गावर वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाली होती. मुठा नदी पूल ते वडगाव बुद्रुक उड्डाण पूल, नवले पूल, नर्‍हे, भूमकर पूल, आंबेगाव दरी पूल, नवीन कात्रज बोगदा परिसर अशा सहा, सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.

या वाहतूक कोंडीत शालेय विद्यार्थी, कामगार, मुंबईकडे जाणारे प्रवासी अडकून पडले. एक तासाने राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने क्रेन बोलावून बंद पडलेला कंटेनर बाजूला घेतला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक, प्रवाशांबरोबर नागरिकांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागला.

बापूसाहेब पोकळे म्हणाले, ‘वारजे मुठा नदी पूल अरुंद आहे, तसेच परिसरातील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. नदी पूल व वडगाव उड्डाण पूल परिसरात नेहमीच अवजड वाहने बंद पडतात. यामुळे होणार्‍या वाहतूक कोंडीचा त्रास वाहनचालक व नागरिकांना सहन करावा लागत आहे. ही समास्या सोडविण्यासाठी महामार्ग प्रशासनाने त्वरित उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.’

मुठा नदावरील पुलावर कंटेनर बंद पडल्याने रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. नांदेड-शिवणे नदी पूल पाण्याखाली गेल्यामुळे नांदेड बाजूची संपूर्ण वाहतूक या नदी पुलाकडे वळविली होती. यामुळे महामार्गावर वाहतुकीचा ताण वाढला. क्रेनच्या साहाय्याने बंद पडलेला कंटेनर बाजूला घेतल्यानंतर वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली.

                   उदयसिंह शिंगाडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सिंहगड वाहतूक शाखा

Back to top button