बारामती : जिल्ह्यांतर्गत बदल्या दिवाळीपूर्वी करा; ग्रामविकासमंत्र्यांकडे शिक्षक संघाची मागणी | पुढारी

बारामती : जिल्ह्यांतर्गत बदल्या दिवाळीपूर्वी करा; ग्रामविकासमंत्र्यांकडे शिक्षक संघाची मागणी

बारामती; पुढारी वृत्तसेवा: राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या दिवाळीपूर्वी करा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष केशव जाधव यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली. संघाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (दि. 13) मुंबई येथे ग्राम विकासमंत्री महाजन यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. त्या वेळी ही मागणी केल्याची माहिती बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष हनुमंत शिंदे व सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड यांनी दिली.

तीन वर्षे दुर्गम-डोंगरी भागात सेवा बजावणार्‍या शिक्षकांची बदली सोयीच्या ठिकाणी व्हावी, याकरिता बदलीचे सुधारित बदली धोरण तयार केले आहे. वास्तविक पाहता शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच मे महिन्याच्या अखेरीस बदल्या होणे अपेक्षित होते. परंतु, काही कारणांनी त्या अद्याप झाल्या नाहीत. त्यामुळे दुर्गम व डोंगरी भागातील शिक्षक अस्वस्थ आहेत. त्यामुळे ही बदलीप्रक्रिया दिवाळीपूर्वी पूर्ण व्हावी, अशी शिक्षक संघाची आग्रही भूमिका असल्याचे बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे नेते महादेव गायकवाड यांनी सांगितले.

सन 2018 पासून अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची प्राधान्याने सोय करावी. उपशिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांची रिक्त पदे तातडीने भरावीत. ग्रामीण भागातील सरकारी शाळांच्या भौतिक सुविधांसाठी भरीव आर्थिक तरतूद करावी, मुख्यालयी राहण्याच्या अटींची सक्ती करू नये, तसेच त्यांच्या आधारे कोणाही कर्मचार्‍याचा घरभाडे भत्ता बंद करू नये, अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

शिक्षक संघाने उपस्थित केलेल्या सर्व मागण्यांबाबत ग्राम विकासमंत्री गिरीश महाजन यांनी अनुकूलता दर्शवली असून, लवकरच सर्व निर्णय अमलात आणू, अशी ग्वाही त्यांनी दिली. या वेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष राजाराम वरुटे, सल्लागार वसंत हारुगडे व ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष भगवान भगत उपस्थित होते.

Back to top button