वेल्ह्यात आढळले डेंग्यूचे 15 रुग्ण; सिंहगड भागातही तापाची साथ | पुढारी

वेल्ह्यात आढळले डेंग्यूचे 15 रुग्ण; सिंहगड भागातही तापाची साथ

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: वेल्हे व परिसरात डेंग्यूचे 15 रुग्ण सापडल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. पानशेतसह पश्चिम हवेली तसेच सिंहगड भागातही तापाचे रुग्ण वाढले आहेत. दुसरीकडे, वेल्हे तालुक्यात डेंग्यू अथवा इतर रोगांची साथ नाही, असा दावा आरोग्य विभागाने केला आहे. मात्र, गेल्या आठ-दहा दिवसांपासून वेल्हे, तोरणा, राजगड या भागांत तापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे.

गेल्या आठ दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. गावोगावांतील रस्ते, गटारांमध्ये पाण्याची डबकी साठली आहेत. त्यामुळे डास, कीटकांची उत्पत्ती वाढली आहे. त्यामुळे तापाचे रुग्ण वाढले आहेत. लहान मुलांसह शालेय विद्यार्थी, महिला, नागरिक सर्दी, खोकला, ताप अशा आजाराने त्रस्त झाले आहेत. सरकारी तसेच खासगी दवाखान्यांत मोठ्या संख्येने रुग्ण गर्दी करीत आहेत.

जिल्हा परिषदेच्या करंजावणे आरोग्य केंद्रातील 9 रुग्णांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय आरोग्य तपासणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यात तीन रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबत करंजावणे आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कावेरी बांगर म्हणाल्या की, तीनपैकी दोन रुग्ण करंजावणे येथील व एक रुग्ण भोर तालुक्यातील कुरंगवडी येथील आहे. डेंग्यू व इतर आजार रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने साफसफाई, स्वच्छता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गेल्या आठ ते दहा दिवसांत प्राथमिक तपासणीत डेंग्यूचे 12 रुग्ण सापडले आहेत. त्यातील सर्वाधिक 9 रुग्ण वेल्हे येथील आहेत. अन्य रुग्ण इतर तालुक्यांतील विविध गावांतील आहेत. रुग्णालयात तपासणी करण्यात येणार्‍या 100 रुग्णांत दोन ते तीन रुग्ण सापडत आहेत. रुग्णांत डेंग्यूसदृश लक्षणे आहेत. मात्र, राष्ट्रीय प्रयोगशाळेत तपासणी केली जात नाही. त्यामुळे डेंग्यूची साथ नाही. डासोत्पत्तीची ठिकाणे नष्ट करून घर व परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा.

                                                            – डॉ. परमेश्वर हिरास,
                                                      अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, वेल्हे

150 रुपयांत सर्व तपासण्या
वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात 150 रुपयांत डेंग्यू, इतर आजारांसह सर्व तपासण्या केल्या जात आहेत. खासगी रुग्णालय व लॅबच्या तुलनेत अल्प दरात तपासणी होत आहे. त्यामुळे वेल्हे रुग्णालयात तपासणीसाठी रुग्ण गर्दी करीत आहेत.

आरोग्य केंद्रात मोफत तपासण्या
वेल्हे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या करंजावणे व पासली तसेच हवेली तालुक्यातील खानापूर, सांगरुण आदी प्राथमिक आरोग्य केंद्रांत डेंग्यू व इतर आजारांच्या तपासण्या मोफत करण्यात येत आहेत.

खासगी दवाखाने, लॅबकडून लूट
सरकारी आरोग्य केंद्रात मोफत तसेच ग्रामीण रुग्णालयात अल्प दरात विविध आजारांची तपासणी केली जात आहे. असे असले तरी खासगी दवाखान्यांत मोठ्या संख्येने रुग्ण उपचारांसाठी दाखल होत आहेत. तेथे डेंग्यू व इतर तपासण्यांसाठी 500 रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत एका रुग्णाकडून घेतले जात आहेत. खासगी तपासणीच्या दरात मोठी तफावत आहे. खासगी दवाखान्यातील बाधित रुग्णांची माहिती सरकारी यंत्रणेला दिली जात नाही. याकडे आरोग्य प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. असे चित्र दुर्गम वेल्हे, पानशेतसह खानापूर, सिंहगड भागात आहे.

Back to top button