पिंपरी : शहरातील आयटीआयच्या 268 जागा शिल्लक | पुढारी

पिंपरी : शहरातील आयटीआयच्या 268 जागा शिल्लक

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरातील शासकीय व महापालिकेच्या अशा एकूण 3 आयटीआयमधील एकूण 1 हजार 212 जागांपैकी आत्तापर्यंत झालेल्या पाच फेर्‍यात 944 जागा भरल्या गेल्या आहेत. तर, अद्याप 268 जागा रिक्त आहेत. निगडी-यमुनानगर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत फाउंड्री काम आणि सुतारकाम या अभ्यासक्रमांना प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान, सध्या अतिरिक्त समुपदेशन फेरी सुरू करण्यात आली आहे. दहावीच्या पुरवणी परीक्षेचा नुकताच निकाल लागला आहे. त्यांना आयटीआय अभ्यासक्रमासाठी संधी मिळावी तसेच ज्यांनी आत्तापर्यंत ऑनलाइन अर्ज भरलेले नाही, त्यांच्यासाठी ही अतिरिक्त समुपदेशन फेरी जाहीर करण्यात आली आहे. या फेरीदरम्यान 13 ते 17 तारखेदरम्यान प्रवेश निश्चित करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. मात्र, त्यासाठी 11 तारखेपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी देण्यात आली होती.

प्रवेशाच्या पाच फेर्‍या पूर्ण
आयटीआय प्रवेशाच्या पाच फेर्‍या आत्तापर्यंत पूर्ण झाल्या आहेत. महापालिकेच्या मोरवाडी येथील आयटीआयमध्ये 500 पैकी 460 जागा भरल्या आहेत. प्लंबरच्या 40 जागांपैकी 20 तर, शीटमेटल वर्करसाठी 40 पैकी 20 जागा भरणे बाकी आहे. कासारवाडी येथील महिला आयटीआयमधील 140 जागांपैकी 133 जागा आत्तापर्यंत भरल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकलच्या 6 तर, डीटीपी या अभ्यासक्रमाची 1 जागा शिल्लक आहे. निगडी-यमुनानगर येथील शासकीय आयटीआयमध्ये 572 जागांपैकी 351 जागा आत्तापर्यंत भरण्यात आल्या आहेत. 221 जागा भरणे अद्याप बाकी आहे.

इलेक्ट्रीशियन, ड्रॉफ्टसमन मेकॅनिकल, टर्नर आदी ट्रेडना पसंती
महापालिकेच्या मोरवाडी आयटीआयमधील इलेक्ट्रिशियन, ड्रॉफ्टसमन मेकॅनिकल, टर्नर, मेकॅनिकल मोटर व्हेईकल, फीटर, वायरमन, आरएसीपी, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल आदी अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांकडून पसंती मिळत आहे. तर, कासारवाडी येथील महिला आयटीआयमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर अ‍ॅण्ड प्रोग्रॅम असिस्टंट, फॅशन डिझाईन टेक्नॉलॉजी, बेसिक कॉस्मोटोलॉजी आदी अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांकडून प्राधान्य मिळत आहे, अशी माहिती प्राचार्य शशिकांत पाटील यांनी दिली.

फाउंड्री, कार्पेंटर अभ्यासक्रमाला अत्यल्प प्रतिसाद
निगडी-यमुनानगर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत फाउंड्री आणि सुतारकाम (कार्पेंटर) या अभ्यासक्रमांना अत्यल्प प्रतिसाद मिळतो. यंदा आत्तापर्यंत फाउंड्री अभ्यासक्रमाच्या 48 जागांपैकी एकही जागा भरलेली नाही. कार्पेंटरच्या 48 जागांपैकी एकच जागा भरली गेल्याने संबंधित जागेवरील विद्यार्थ्याला प्लंबर या जागेवर प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती प्राचार्य शशिकांत साबळे यांनी दिली.

Back to top button