पुणे : जुना पूल बंद; नवा सुरू ! चांदणी चौक पुलावरील वाहतूक अचानक बंद केल्याने गोंधळ | पुढारी

पुणे : जुना पूल बंद; नवा सुरू ! चांदणी चौक पुलावरील वाहतूक अचानक बंद केल्याने गोंधळ

पुणे : पुढारी वृत्तसेवा : चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याचा दिवस अजूनही निश्चित झालेला नाही. मात्र, तो पूल वाहतुकीसाठी अचानक बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी वाहनधारकांची तारांबळ उडाली. पूल वगळता त्याचा इतर भाग पाडला जात असून, मुळशीकडून कोथरूड, पाषाण, बावधनकडे येणार्‍या वाहनधारकांसाठी नव्याने बांधण्यात आलेला उड्डाणपूल सुरू करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), वाहतूक पोलिस विभाग आणि इतर स्थानिक प्रशासनाने संयुक्तिक नियोजन केले आहे. त्यानुसार जुन्या पुलाचा इतर भाग पाडला जात आहे. तत्पूर्वी जवळून जाणारी पाण्याची पाइपलाइन, इतर संस्थांच्या लाइनचे स्थलांतर तसेच पूल पाडण्यापूर्वी आणि पाडल्यानंतरचा पर्यायी बाह्य वळण रस्ता आदींचे नियोजन महत्त्वाचे असून, त्याबाबत अहोरात्र काम सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी साधारणतः पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

जुन्या पुलावरून जाणार्‍या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे, त्यानुसार पर्यायी रस्ता सुरू करण्यात आला आहे. त्यावरून वाहतूक वळवण्यात आली आहे. तसेच जलवाहिनी आणि इतर वाहिन्यांचे स्थलांतर करून सुविधा सुरू ठेवणे महत्त्वाचे आहे, तोपर्यंत पूल पाडता येणे शक्य नसल्याचे संबंधित कंपनीच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

त्यानुसार ‘एनएचएआय’ने पर्यायी बाह्य वळण रस्ता, सर्व्हिस पाईप हलविण्यासाठी लोखंडी गर्डर्स आदींबाबत काम सुरू केले आहे, तर पुलाजवळील परिसरातील स्थानिकांचे स्थलांतर, पूल पाडल्यानंतर 9 ते 10 तासांचा मोठा ट्रॅफीक ब्लॉक, पूल कोसळल्यानंतर पडलेला मलबा काढण्यासाठीची व्यवस्था, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ आणि वाहने आदींचे केले आहे.

यंत्रणेकडून पूर्वसूचना नाही
चांदणी चौकातील पुलावर ड्रिलिंगचे काम करण्यासाठी मंगळवारी सकाळपासूनच पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. महामार्ग प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय आणि वाहतूक पोलिस यापैकी कोणत्याही यंत्रणेने पूल बंद ठेवण्यासंदर्भातील पूर्वसूचना दिली नव्हती. त्यामुळे अचानक पूल बंद केल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी काही प्रमाणात कोंडी झाली.

चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यासंदर्भात अजून दिवस ठरलेला नाही. पूल पाडणार्‍या कंपनीने अजून आठ दिवसांचा
वेळ मागितला आहे. त्यासंदर्भात आमची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे पुलाचा इतर भाग तोडण्याचे काम सुरू करण्यात आले असून, त्यावरील संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहतुकीसाठी नव्याने बांधण्यात आलेला पूल सुरू करण्यात आला आहे.
                                             – संजय कदम, प्रकल्प संचालक, एनएचएआय,पुणे.

Back to top button