शेळगाव : निरा डावा कालव्याचे अस्तरीकरणाच्या समर्थनासाठी रस्ता रोको आंदोलन | पुढारी

शेळगाव : निरा डावा कालव्याचे अस्तरीकरणाच्या समर्थनासाठी रस्ता रोको आंदोलन

शेळगाव; पुढारी वृत्तसेवा: इंदापूर तालुक्यात निरा डावा कालव्याच्या होऊ घातलेल्या अस्तरीकरणाच्या समर्थनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी इंदापूर -बारामती पालखी मार्गावरील चौपन्नफाटा येथे २२ गावे कृती समितीच्या वतीने १२ सप्टेंबरला भजन गावुन तसेच बैलाना आणून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी निरवांगी, हगारेवाडी, निमसाखर, शिरसटवाडी, बोराटवाडीसह अन्य गावांनी कालव्याचे अस्तरीकरण झाले पाहिजे असा ठराव देखील केला आहे.

यावेळी प्रास्ताविक मध्ये बोलताना रवी पवार यांनी सांगितले कि, निरा डावा कालवा हा १०० वर्षापासून अधिक वर्षाचा असून अनेक ठिकाणी पाण्याची गळती होत आहे आणि शेतकऱ्यांना त्यामुळे वेळेवर पाणी मिळत नसल्यामुळे पिके जळून जात आहेत, तसेच पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचे मोठे हाल होत आहेत म्हणून आम्ही २२ गावातील शेतकरी कालव्याचे अस्तरीकरण झाले पाहिजे यासाठी आंदोलन करत आहोत.

दरम्यान, शासनाच्या वतीने जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता आश्विन पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे, मंडल अधिकारी शहाजी राखुंडे, जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता रतनकुमार झगडे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. यावेळी जलसंपदा विभागाचे हनुमंत ननवरे, गोतोंडी चे तलाठी प्रशांत कांबळे, पोलीस पाटील, तसेच पोलिस उप निरीक्षक मिलिंद मिठापल्ली उपस्थित होते. आंदोलनानंतर वालचंदनगर पोलिसांनी वाहतूक सुरळीतपणे सुरू केली.

Back to top button