वेल्हे : पावसाने खडकवासला साखळीवर जागता पहारा | पुढारी

वेल्हे : पावसाने खडकवासला साखळीवर जागता पहारा

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: गेल्या दहा दिवसांपासून पडत असलेल्या परतीच्या पावसाने खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांवर जलसंपदा विभागाचे अधिकारी, कर्मचारी जागता पहारा देत आहेत. धरणे 100 टक्के भरल्याने जादा पाणी सोडण्यासाठी रात्रंदिवस धावपळ करावी लागत आहे. शनिवारी (दि. 10) सायंकाळी पाच वाजता धरण साखळीत 29.08 टीएमसी म्हणजे 99.77 टक्के पाणीसाठा होता. टेमघर वगळता सर्व धरणे 100 टक्के भरली आहेत.

दिवसभरात पानशेत येथे 14, वरसगाव येथे 12 व टेमघर येथे 15 मिलीमीटर पाऊस पडला तर खडकवासलात तुरळक प्रमाणात पाऊस पडला. ठराविक भागात जोरदार तर काही भागात तुरळक पाऊस पडत आहे. सायंकाळी सात वाजेनंतर पावसाने उघडीप घेतली. सिंहगड, मुठा, पानशेत, वरसगाव धरण खोर्‍यासह डोंगरी पट्ट्यात पावसाळी वातावरण आहे.

गेल्या आठवड्यापासून परतीच्या पावसाची दररोज हजेरी सुरू आहे. त्यामुळे धरणातून जादा पाणी सोडण्यात येत आहे. सध्या खडकवासलातुन मुठा नदीच्या पात्रातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. मुठा कालव्यात 150 क्यूसेक पाणी सोडले जात आहे.

खडकवासला धरण साखळीतील टेमघर वगळता सर्व धरणे 100 टक्के भरली आहेत. पावसामुळे येणारे जादा पाणी सोडण्यात येत आहे. धरण क्षेत्रात अचानक जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे सर्व धरणावर रात्रंदिवस यंत्रणा सज्ज आहे.
– योगेश भंडलकर, उपविभागीय अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग

ओढ्या-नाल्यातून पाण्याचे प्रवाह धरणात
सध्या पडत असलेल्या पावसाचा लाभ पुणेकरांसह शेतीला दिलासा मिळाला आहे. शनिवार सकाळपासून सायंकाळपर्यंत पानशेत, वरसगाव, मुठा खोर्‍यासह सिंहगड भागात जोरदार पाऊस पडला. पुन्हा रात्री मेघगर्जनेसह सिंहगड, पानशेत भागात पावसाच्या सरी कोसळत होत्या. ओढ्या-नाल्यांतून पाण्याचे प्रवाह सुरू आहेत. पिण्यासाठी तसेच मुठा कालव्यात मुबलक पाणी सोडूनही खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. पानशेत व वरसगाव धरणे शंभर टक्के भरली आहेत, तर टेमघरमध्ये 98.18 टक्के पाणी साठा आहे.

 

Back to top button