पुणे : मुख्यमंत्री ‘वर्षा’वरच…पुण्यात चक्का जाम! | पुढारी

पुणे : मुख्यमंत्री ‘वर्षा’वरच...पुण्यात चक्का जाम!

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत वर्षा बंगल्यावर… पुण्यातील पोलिस मात्र अतिदक्ष… मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याची नियोजित वेळ पाळत मध्यवस्तीतील शिवाजी व बाजीराव रस्ते अचानक बंद… लक्ष्मी रस्ता अगोदरच बंद… त्यातच वरुणराजाही अधूनमधून हजेरीला…अशा अवघड स्थितीत वाहनचालक आजूबाजूच्या गल्ल्यात चोहोबाजूंनी शिरले आणि संपूर्ण मध्यवस्तीत वाहतूक जाम झाली. मुख्यमंत्री आले. कसबा पेठ, बुधवार पेठ, लक्ष्मी रस्ता, मंडई, तुळशीबाग, केळकर रस्ता, अशा शहराच्या मध्यवस्तीतून त्यांच्या गाड्यांचा ताफा फिरू लागला. ताफ्यात पोलिसांच्या गाड्यांसह आठ-दहा गाड्यांचा समावेश होता.

सुमारे पावणेदोन तास उशिराने मुख्यमंत्री दुपारी दीड वाजता कसबा गणपती मंडळापाशी पोहोचले. आणि जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू झाली. प्रत्येक ठिकाणी आरती करीत शिंदे पुढील मंडळांकडे जात होते. त्यांचा मार्ग मोकळा ठेवण्यासाठी पोलिसांनी वाहतूक थांबविलेलीच. त्यामुळे वाहतुकीची कोंडी वाढतच गेली. मुख्यमंत्री त्यानंतर नवी पेठ, कर्वे रस्ता परिसरात गेल्याने, त्या भागातही वाहतूक तुंबली.

त्यापरीणामी, जंगलीमहाराज रस्ता, प्रभात रस्त्यावरही वाहने थांबून राहिली. मुख्यमंत्री कर्वे रस्त्यावर आरतीसाठी गेल्याने पौड फाटा येथेही कोंडी झाली. शिवाजीनगर भागातही वाहतूक कोंडीचा फटका बसला. गणेशोत्सवामुळे वाहतूक संथ असते. याचा अंदाज असल्याने दुचाकीस्वार गल्लीबोळातून वाहने नेतात. अशा वेळी मुख्य रस्ते बंद केल्याने, तेथील वाहतूकही दोन्ही बाजूंच्या गल्लीत शिरली. तेथे मंडपांमुळे कोंडी वाढत गेली. मग वाहनचालकांना मागे परत वळता येत नव्हते.

व्हीआयपींसाठी रस्ते किती वेळ बंद ठेवणार
मुख्यमंत्री आणि अन्य प्रमुख व्यक्ती आल्यानंतर, ते येण्यापूर्वी पंधरा-वीस मिनिटे वाहतूक थांबविणे अपेक्षित असते. गणेशोत्सवात गर्दी झाल्यावर आधीच प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक थांबविण्याचे जाहीर केलेले असते. मात्र, त्या वेळी पर्यायी मार्गावरील वाहतूक नियोजनासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्याची गरज असते. या वेळी व्हीआयपी येण्यापूर्वी बराच काळ त्यांच्या दौर्‍याच्या मार्गावरील वाहतूक बंद ठेवली, तसेच पर्यायी मार्गांवर वाहतूक नियोजन केले नाही. त्यामुळे सर्वत्र वाहतूक कोंडी झाली. नियोजन नीट न झाल्याने अनेक वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली.

वाहतूक पोलिसांचे नियोजनच नाही
मुख्य रस्ते बंद केल्यानंतर पेठांतील गल्लीबोळांत वाहतूक कोंडी होणार, हे लक्षात घेऊन आतील रस्त्यांवर वाहतूक पोलिसांची नियुक्ती करणे अपेक्षित होते, अशी प्रतिक्रिया वाहनचालकांनी व्यक्त केली. बाजीराव रस्त्यावर वाहतूक बंद केली. तेथे दहा-बारा पोलिस एकाच ठिकाणी थांबलेले. तीच परिस्थिती टिळक चौकात. मग आतील रस्त्यावर कोंडीच्या ठिकाणी वाहतूक पोलिस नियुक्त केले असते, तर तेथे वाहतूक किमान संथ गतीने सुरू ठेवता आली असती. वाहतूक पोलिसांचे नियोजन नसल्याने, पर्जन्यवृष्टीतच वाहनचालकांना थांबावे लागले. दोन-तीन तासांपेक्षा अधिक काळ वाहतुकीची कोंडी झाल्याने, वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडाला होता.

दहा मिनिटे वाट पाहा बाळा…
‘दहा मिनिटे वाट पाहा बाळा. मॅडमना सांग. लगेच पोहोचतो. वाहतूक कोंडीत अडकलो आहे…,’ वाहतूक कोंडीत अडकलेले एक आजोबा मोबाईलवरून सांगत होते. सदाशिव पेठेत चोहोबाजूंनी वाहनांनी घेरलेल्या स्थितीत ते थांबलेले होते. अशा वेळी त्यांचा मोबाईल खणखणतो. ते आजोबा अजीजीने लवकर पोहोचण्याचे आश्वासन देत होते. त्यांचा लहान नातू शाळेत गेला होता. त्याला आणण्यासाठी ते दुचाकीवरून जात होते. मात्र, अर्धा तास ते कोंडीतच अडकून पडले होते. त्यांची केवीलवाणी अवस्था आणि शाळेत अडकलेल्या त्या लहानग्याची अवस्था डोळ्यांसमोर आल्याने आजूबाजूंचे वाहनचालकही अस्वस्थ झाले. चोहोबाजूला वाहने असल्याने, त्या आजोबांनाही पुढे पाठविता येत नसल्याचे त्या वाहनचालकांना जाणवले.

Back to top button