नगर : थांबू नका, कामांसाठी सज्ज रहा! जिल्हा परिषदेच्या बैठकीमध्ये विभागप्रमुखांना सूचना | पुढारी

नगर : थांबू नका, कामांसाठी सज्ज रहा! जिल्हा परिषदेच्या बैठकीमध्ये विभागप्रमुखांना सूचना

नगर; पुढारी वृत्तसेवा: सध्या ‘नियोजन’चा निधी थांबविला असला, तरीही सज्ज रहा. या निधीतून करायची कामे, त्याचे प्रस्ताव सध्या तयार करून ठेवा. अंगणवाडी, शाळा खोल्या कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करा, यासह अन्य विषयांवर सोमवारी (दि.5) मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी विभागप्रमुखांना सक्त सूचना केल्या. दरम्यान, यावेळी ‘लंपी’बाबत शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करून लसीकरणाला वेग द्यावा, अशाही सूचना करण्यात आल्या.

जिल्हा परिषदेतील विभागप्रमुखांचा सोमवारी सीईओ आशिष येरेकर व अतिरिक्त सीईओ संभाजी लांगोरे यांनी नियमित आढावा घेतला. यावेळी विभागप्रमुखांनी गतआठवड्यात केलेली कामे आणि पुढील दिवसांत करायची कामे, यावर चर्चा झाली. यावेळी लंपी रोगाबाबत अतिरिक्त सीईओ संभाजी लांगोरे यांनी अधिकार्‍यांकडून वस्तुस्थिती जाणून घेत, लसीकरणाला वेग देण्याच्या सूचना केल्या. तसेच, शेतकर्‍यांमध्ये या आजाराबाबत जनजागृती करण्याचेही आवाहन केले.

सध्या जिल्हा नियोजनमधून मिळणारा निधी ठप्प झालेला आहे. पालकमंत्री नेमणूक होईपर्यंत हा निधी मिळणार नसल्याचे संकेत आहेत. त्यामुळे तोपर्यंत हातावर हात ठेवून न बसता, आपल्याला जी कामे प्राधान्याने करायची आहेत, त्यांची कागदोपत्री तयारी करा. अंगणवाडी, शाळा खोल्यांच्या कामाचे प्राधान्यक्रम ठरवा, यावरही चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजले.

दरम्यान, दर सोमवारी नियमितपणे विभागप्रमुखांचा आढावा घेतला जाईल. याशिवाय सप्टेंबर ते डिसेंबर 2022 आणि जानेवारी ते मार्च 2023 या कालावधीत कशाप्रकारे कामाला गती द्यायची, याबाबतही मायक्रो प्लॅन तयार करण्यात आला आहे. यावेळी विभाग प्रमुखांनीही आपल्याला येणार्‍या तांत्रिक अडचणी निदर्शनास आणून दिल्याने त्यावरही सकारात्मक चर्चा झाल्याचे समजले.

..तर जबाबदारी निश्चिती!
बांधकाम विभागात झालेली काही कामे निकृष्ट झाल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे काही ठिकाणी अवघ्या दहा-बारा वर्षांतच बांधकामे धोकादायक झाल्याने त्यांचे निर्लेखन करावे लागत आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर आणि विभाग प्रमुखांवरही ‘जबाबदारी निश्चिती’ं करण्याबाबत बैठकीतून प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्याचीही चर्चा आहे.

Back to top button