बारामती : शिक्षणसेवकांचे मानधन 15 हजार करणार: शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे आश्वासन | पुढारी

बारामती : शिक्षणसेवकांचे मानधन 15 हजार करणार: शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे आश्वासन

बारामती; पुढारी वृत्तसेवा: राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षणसेवकांचे मानधन पंधरा हजार करणार, असे आश्वासन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास दिल्याची माहिती बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष हनुमंत शिंदे व सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड यांनी दिली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष केशवराव जाधव यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने रविवारी (दि. 4) सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथे मंत्री केसरकर यांची भेट घेतली.

प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांचे निवेदन या वेळी देण्यात आले. शिक्षकांना फक्त शिकवण्याचे काम द्यावे, प्राथमिक शिक्षकांची 31 हजार रिक्त पदे तातडीने भरावीत, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांची 100 % पदे पदोन्नतीने प्राथमिक शिक्षकांतून भरावीत, ‘आपले गुरुजी’ परिपत्रकास त्वरित स्थगिती द्यावी, कोविड काळात मृत शिक्षकांच्या वारसांना विमाकवच रक्कम त्वरित मिळावी आदी मागण्यांवर चर्चा झाली.

अशैक्षणिक त्वरित कामे बंद केली जातील, राज्यातील रिक्त पदांपैकी 50 % पदे तातडीने भरणार, वर्गात फोटो लावण्याचे परिपत्रक रद्द करणार, प्राथमिक शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना लागू करणे यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांची जास्तीत जास्त पदे शिक्षकांतून भरणार आदींबाबत अधिकार्‍यांना सूचना केल्या जातील, असे आश्वासन केसरकर यांनी दिले. माधवराव पाटील यांनी शिक्षणसेवक मानधनवाढीबाबत मागणी केली. हे मानधन 15 हजार रुपये करणार आहे.

राज्य प्राथमिक शिक्षण संघाची शिक्षण परिषद मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होईल, अशी ग्वाही केसरकर यांनी दिली. शिक्षक दिनानिमित्त केसरकर यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या तसेच प्रातिनिधिक स्वरूपात राज्याध्यक्ष केशवराव जाधव यांचा सत्कार केला. माजी अध्यक्ष राजाराम वरुटे, कोशाध्यक्ष संभाजी बापट, सल्लागार वसंतराव हरगुडे, बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष हनुमंत शिंदे आदी उपस्थित होते.

 

 

Back to top button