आकुर्डी रेल्वे बोगद्यातील खड्ड्याचा नाही थांगपत्ता | पुढारी

आकुर्डी रेल्वे बोगद्यातील खड्ड्याचा नाही थांगपत्ता

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : घटना 1 : शाळेतील मुलांना रिक्षामधून घेऊन जात होतो. अचानक आलेल्या पावसाने आकुर्डी येथील रेल्वे बोगद्यात पाणी साचले होते. पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने बोगद्यातील मोठ्या खड्ड्यात रिक्षा अडकली. जोराचा झटका बसल्याने रिक्षातील काही मुलांच्या डोक्याला आणि तोंडाला किरकोळ मार लागला. मात्र, तेवढ्यात पाठीमागील वाहनाने धडक दिली आणि पुन्हा गाडीचे नुकसान झाले. काही वाहनचालकांनी मदत करून रिक्षा खड्ड्यातून बाहेर काढण्यास मदत केली.
:अभिजित पांढरे, रिक्षाचालक, निगडी.

घटना 2  : आकुर्डी येथील बोगद्यामधून पत्नीसह दुचाकीवर जात होतो. या मार्गात पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्याचा अंदाज आला नाही, परिणामी माझ्या वाहनाचा अपघात झाला. आम्ही दोघे दुचाकीवरून पडलो. हाता-पायाला खरचटल्याने ईजा झाली. तसेच वाहनाचेही नुकसान झाले. महापालिका ज्या प्रमाणात कर वसूल करते, त्या प्रमाणात सुविधा मात्र देत नाही.

: नीलेश ओंबळे, नागरिक, आकुर्डी.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कर्मचारी शहरातील रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करीत आहे. नागरिकांच्या अनेक तक्रारी सारथी अ‍ॅपवर येत आहेत. तरीही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या घटना आकुर्डी रेल्वे स्टेशन येथील धर्मराज चौकाकडे जाणार्‍या बोगद्यातील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या मार्गात मोठा खड्डा असल्याने त्या ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यास वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. परिणामी अपघाताच्या घटना घडत आहेत. येथे बसविलेले ब्लॉक काही दिवसांपूर्वी उखडून गेले आहेत. या भागात दाट लोकवस्ती असल्याने या मार्गात सतत रहदारी असते, त्यामुळे दिवसाला बरेच किरकोळ अपघाताच्या घटना येथे घडत आहेत. आकुर्डी रेल्वे बोगद्यातील खड्डा तत्काळ बुजविण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी डागडुजी करण्यात आली होती. मात्र पावसामुळे येथील ब्लॉक निघाले आहेत. त्याबाबत कर्मचार्‍यांना माहिती देऊन आदेश दिले आहेत.
                                       – प्रशांत पाटील, कार्यकारी अभियंता, ‘ब’ प्रभाग.

 

Back to top button