कोयेत एक एकरवरील आंबा रोपांची मोडतोड; अज्ञाताविरोधात पोलिसांत तक्रार | पुढारी

कोयेत एक एकरवरील आंबा रोपांची मोडतोड; अज्ञाताविरोधात पोलिसांत तक्रार

भामा आसखेड; पुढारी वृत्तसेवा: कोये (ता. खेड) येथील शेतकरी शंकर भीमाजी शेंडगे यांच्या एक एकर क्षेत्रात लागवड केलेल्या आंबा रोपांची मोडतोड अज्ञात व्यक्तीने केल्याची तक्रार पाईट पोलिस चौकीत दिली आहे. या आरोपींचा शोध घेऊन कारवाईची मागणी शेतकरी शेंडगे यांनी केली आहे. शेतकरी शंकर शेंडगे यांची शेती धामणे रस्त्यालगत कोये गावच्या हद्दीत आहे. कृषी विभागांतर्गत शेतात फळबाग लागवड करण्यासाठी कृषी विभागाची शासकीय रोपवाटिका असलेली रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथून आंब्यांची कलमी रोपे खरेदीने आणली होती. शेंडगे यांनी एक एकर क्षेत्रात खड्डे घेऊन रोपांची लागवड केली.

रोपांची लागवड केल्यानंतर त्याच रात्री काही अज्ञात व्यक्तीने लावलेली रोपे काढून फेकून दिली, तर काही रोपांची मोडतोड केली. लावलेल्या रोपांची मोडतोड झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर शेतकर्‍याने जी रोपे चांगली होती त्या रोपांची पुन्हा लागवड केली असता, अज्ञात व्यक्तीने पुन्हा दुसर्‍या रात्री रोपे उपटून मोडतोड केली. शेंडगे या शेतकर्‍याने पाईट पोलिस चौकीत अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली.

पाईट चौकीत तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. कृषी विभाग व तहसीलदार यांना अर्ज करून पंचनामा करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकरी शेंडगे यांनी केली. घटनास्थळी ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकार्‍यांसह, सरपंच रामदास राळे, उपसरपंच गोविंद राळे, सदस्य रंगनाथ राळे, सोसायटी अध्यक्ष शांताराम गोगावले आदी ग्रामस्थ आले होते.

Back to top button