सोमेश्वरला 30 जणांवर कारवाई; 15 हजार रुपयांचा दंड वसूल | पुढारी

सोमेश्वरला 30 जणांवर कारवाई; 15 हजार रुपयांचा दंड वसूल

सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा: रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी वडगाव निंबाळकर पोलिसांनी कंबर कसली असून, शाळा आणि महाविद्यालय परिसरात विनाकारण फिरणार्‍यांवर कारवाई केली जात आहे. दोन दिवसांत तब्बल 30 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे आणि उपविभागीय अधिकारी बारामती यांच्या निर्भया पथकातील पोलिस कर्मचार्‍यांनी सोमेश्वर इंजिनिअरिंग महाविद्यालय, मुगटराव काकडे महाविद्यालय आणि सोमेश्वर माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय परिसरात जात विनाकारण फिरणार्‍या 6 जणांवर कारवाई केली.

तर ट्रिपल सीट दुचाकीवरून प्रवास करणे, विनापरवाना वाहन चालविणे आदी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 30 जणांवर कारवाई करीत 15 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक योगेश शेलार यांनी ही माहिती दिली. याबाबत शनिवारी दै. ‘पुढारी’ने वृत्त प्रसिध्द केले होते. सोमेश्वर येथईल शाळा व महाविद्यालय परिसरात विनाकारण घिरट्या घालणार्‍यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पालक करीत होते.

पोलिसांच्या या कारवाईमुळे पालकांनी समाधान व्यक्त करीत कारवाईत सातत्य राखण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. सोमेश्वर परिसराची शैक्षणिक हब म्हणून ओळख होत आहे. परिसरात जवळपास दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. फलटण, खंडाळा, पुरंदर, बारामती आदी तालुक्यांतील विविध गावांतून विद्यार्थी शिक्षणासाठी सोमेश्वर येथे ये-जा करीत असतात. मात्र, शाळा आणि महाविद्यालये सुटल्यानंतर रस्त्यावर, महाविद्यालयाच्या गेटसमोर, तर कधी थेट विद्यालयातच या रोडरोमिओंचा त्रास वाढला होता.

वडगाव निंबाळकरचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश शेलार, उपविभागीय अधिकारी यांचे निर्भया पथक, सहायक फौजदार दीपक वारुळे, रमेश नागटिळक, सागर देशमाने, संतोष जावीर, नितीन साळवे व होमगार्ड पथकातील कर्मचार्‍यांनी सलग दोन दिवस शाळा व महाविद्यालयांत जात ही कारवाई केली.

शाळा, महाविद्यालयांत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना दुचाकी देताना पालकांनीही त्यांना समजावून सांगत दुचाकी वापरण्यावर बंधन घालावे. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करावे. यापुढेही शाळा, महाविद्यालय परिसरात विनाकारण फिरणार्‍यांवर सातत्याने कारवाई करण्यात येईल.
– योगेश शेलार, पोलिस उपनिरीक्षक                                                                             वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे

Back to top button