पुणे : समित्यांची महिन्यात पुनर्स्थापना; जिल्हा परिषदेचे आदेश | पुढारी

पुणे : समित्यांची महिन्यात पुनर्स्थापना; जिल्हा परिषदेचे आदेश

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कोरोनाच्या काळात शाळा बंद होत्या, त्यापूर्वीच स्थापन झालेल्या शाळा व्यवस्थापन समिती सध्या अस्तित्वात आहेत. त्यांची पुनर्स्थापना करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहेत. अनेक गावांमधील पालकांनी याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या आदेशानुसार, सप्टेंबर महिन्यात शाळांना समित्यांच्या पुनर्स्थापना कराव्या लागणार आहेत.
शाळेतील कामकाजाचे नियंत्रण करण्यासाठी शाळा समिती व्यवस्थापन समितीची महत्त्वपूर्ण भूमिका असते. शिक्षणाच्या विकासात लोकसहभाग राहावा, या दृष्टीने वेळापत्रकही जिल्हा परिषदेने जाहीर केले आहे.

त्यानुसार कार्यवाही करणे शाळांना अनिवार्य राहणार आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार, प्रत्येक शाळेत नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या शाळा व्यवस्थापन समिती गठित करणे व ती प्रत्येक दोन वर्षांनी पुन्हा गठित करण्यात येईल, अशी तरतूद आहे. त्यानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षात ज्या शाळा व्यवस्थापन समितीची मुदत संपली आहे, त्यांनी ही समितीची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. शंभर टक्के पात्र शाळांच्या शाळा व्यवस्थापन समितीचे गठण दि. 5 ते 30 सप्टेंबर या कालावधीत करावे, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केली आहे.

समिती स्थापनेसाठीचे वेळापत्रक
दि. 5 ते 10 सप्टेंबरदरम्यान स्थानिक प्राधिकरणाचे निवडून आलेले एक प्रतिनिधी, शाळेच्या शिक्षकांमधून शिक्षकांनी निवडलेले एक शिक्षक, विद्यार्थी प्रतिनिधी 2 सदस्य निवड करावयाची आहे. पालक सभा घेण्यात यावी. या सभेत पालकांनी निवडलेले शिक्षणतज्ज्ञ, बालविकास तज्ज्ञांची नियुक्ती 13 ते 25 सप्टेंबर यादरम्यान करावी. याच कालावधीत पालक सदस्यांची निवड करावी. पालक सदस्यांतून समिती अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड करण्याचे नियोजन प्राथमिक शिक्षण विभागाने तयार केले आहे.

Back to top button