कात्रज : थकीत वेतन मिळाल्याने गणेशोत्सव गोड; स्वच्छता कर्मचार्‍यांचा प्रश्न अखेर मार्गी | पुढारी

कात्रज : थकीत वेतन मिळाल्याने गणेशोत्सव गोड; स्वच्छता कर्मचार्‍यांचा प्रश्न अखेर मार्गी

कात्रज; पुढारी वृत्तसेवा: कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयअंतर्गत कंत्राटी स्वच्छता कर्मचार्‍यांचा जुलै व ऑगस्ट महिन्याचा पगार थकल्यामुळे आर्थिक संकट ओढवले होते. गणेशोत्सव व गौरी आगमनासारखे सण कोरडेच जाणार, असे वृत्त दै. ‘पुढारी’ने प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि दुसर्‍याच दिवशी एका महिन्याचा थकीत पगार झाला.

त्यामुळे स्वच्छता कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयअंतर्गत अडीचशे कंत्राटी स्वच्छता कर्मचारी आहेत. मनपा प्रशासन व ठेकेदार यांच्यातील निविदा प्रक्रियेच्या मान्यतेसाठी त्यांचा जुलै व ऑगस्ट महिन्याचा पगार रखडला होता. हातावर पोट असणार्‍या स्वच्छता कर्मचारी यांना कुटुंबाचा गाडा ओढणे जिकिरीचे झाले होते, त्यामुळे एका महिला स्वच्छता कर्मचार्‍याने ही अडचण ‘पुढारी’कडे मांडली.

वृत्त प्रसिद्ध होताच मनपा परिमंडळ- 4 उपायुक्त संदीप कदम यांनी तत्काळ दखल घेऊन दुसर्‍याच दिवशी वेतन अदा करण्याचा आदेश दिला आणि रात्री सहा वाजता कामगारांचे पगार झाले. ‘पुढारी’ने आमच्या प्रश्नाला वाचा फोडून न्याय मिळवून दिला, अशा भावनेसह सर्व कामगारांतून आनंद व्यक्त होत आहे.

घरातील किराणा व धान्य संपले होते, त्यातच माझी मुलगी बाळंतपणास आली आहे. तसेच काही महिलांच्या घरी गौरी बसतात. दोन महिने पगार नसल्याने खूप अडचण झाली होती. पण, गुरुवारी एका महिन्याचा पगार मिळाला, त्यामुळे सण आनंदात जाईल.

                                                                              – महिला कामगार

जुलै महिन्याचे वेतन गुरुवारी अदा झाले असून, तीन-चार दिवसांत ऑगस्टचे देखील वेतन स्वच्छता कामगारांना दिले जाईल. तसे नियोजन केले असून, सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. यापुढे स्वच्छता कामगारांना वेळेत पगार मिळावा, याबाबत खबरदारी घेतली जाईल.
                                                               -संदीप कदम, उपायुक्त, परिमंडळ-4

 

Back to top button