खेड शिवापूर : यकृत घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेला अपघात! | पुढारी

खेड शिवापूर : यकृत घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेला अपघात!

खेड शिवापूर; पुढारी वृत्तसेवा: कोल्हापूरहून पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपणासाठी यकृत घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेला पुणे-सातारा महामार्गावर किकवी (ता. भोर) येथे अपघात झाला. रुग्णवाहिकेत असणारे डॉक्टर आणि एक व्यक्ती किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिसांनी अपघातानंतरही प्रत्यारोपणासाठीचे यकृत आणि दोन जखमींना रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये पोहचविले.

कोल्हापूर शहरातून सकाळी निघालेली रुग्णवाहिका (एमएच 14 जेएल 8805) ही पुणे-सातारा रस्त्यावरील किकवी (ता. भोर) या गावच्या हद्दीत आल्यानंतर टायर फुटल्याने उलटली. अपघातस्थळापासून किकवी पोलिस ठाणे जवळच असल्याने पोलिस दल तत्काळ अपघातस्थळी दाखल झाले.

नरेंद्र महाराज नानीज संस्थेची रुग्णवाहिका शेजारीच उभी असल्याने जखमी झालेल्या डॉक्टर व त्यांच्या सहकार्‍यांना तसेच प्रत्यारोपणासाठी आणलेले यकृत व इतर साहित्य रुबी हॉलमध्ये सुरक्षित पोहचविण्यात आलेे, असे सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ यांनी सांगितले. हवालदार जगदीश शिरसाठ, योगेश राजीवडे, राजेंद्र चव्हाण यांनी तत्काळ मदत केल्याने यकृत व डॉक्टर, कर्मचारी यांना सुरक्षित पोहचणे शक्य झाले.

Back to top button