पुणे : करंदीत बिबट्या अखेर जेरबंद | पुढारी

पुणे : करंदीत बिबट्या अखेर जेरबंद

शिक्रापूर, पुढारी वृत्तसेवा : करंदी (ता. शिरूर) येथे वारंवार बिबट्याचे जनावरांवर हल्ले होत होते, तसेच नागरिकांना दर्शन होत होते. या पार्श्वभूमीवर नुकत्याच एका बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले आहे.

करंदी येथे वारंवार बिबट्याचे दर्शन होत असताना व जनावरे मृत्युमुखी पडत असताना परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. यामुळे नागरिकांनी येथे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. शिरूर वनविभागाच्या वतीने येथील राहुल ढोकले यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आलेला होता. ढोकले हे शेतात गेले असता त्यांना या पिंजर्‍यात बिबट्या अडकला असल्याचे दिसून आले.

याबाबतची माहिती मिळताच शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, वनपाल प्रवीण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक बबन दहातोंडे, वनमजूर आनंदा हरगुडे, पोलिस पाटील वंदना साबळे, सर्पमित्र शेरखान शेख, अमोल कुसाळकर, गणेश टिळेकर यांनी शेतात धाव घेत सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे, राहुल ढोकले, राजीरंग ढोकले, रोशन आवटे, सचिन दरेकर, पप्पू झेंडे. राहुल दरेकर यांच्या मदतीने या बिबट्याला माणिकडोह (जुन्नर) येथील बिबट निवारण केंद्रात हलविले.

दरम्यान, बिबट्या पिंजर्‍यात जेरबंद झाल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, वनविभागाने पुन्हा पिंजरा लावून येथे असलेल्या आणखी एका बिबट्याला पकडून न्यावे, अशी मागणी नागरिक व ग्रामस्थ करत आहे.

Back to top button