चाकण : स्कूलबस वाचवताना भरधाव कंटेनर इमारतीत | पुढारी

चाकण : स्कूलबस वाचवताना भरधाव कंटेनर इमारतीत

चाकण; पुढारी वृत्तसेवा: नाशिककडून पुणेकडे जाणार्‍या स्कूल व कंटेनरचा विचित्र अपघात झाल्याची घटना चाकण जवळील मुटकेवाडी (ता. खेड) येथील चौकात सोमवारी (दि. 29) सकाळी आठच्या सुमारास घडली. स्कूल बसने चौकात अचानक यू टर्न घेतल्याने पाठीमागून आलेला कंटेनर बसला वाचवण्याच्या प्रयत्नात लगतच्या इमारतीवर जाऊन आदळला. यात इमारतीचे तसेच त्या समोरील दुचाकींचे मोठे नुकसान झाले.

पुणे-नाशिक महामार्गावरून एक स्कूल बस (एमएच 12 क्यूजी 8060) आणि वाहनांची बॅटरी वाहतूक करणारा कंटेनर (एनएल 01 एबी 1235) ही दोन्ही वाहने नाशिक बाजूने जात होती. पुढे जाणार्‍या स्कूल बसने चाकणजवळील मुटकेवाडी चौकात अचानक वळण्यासाठी यू टर्न घेतला. बसमध्ये विद्यार्थी असतील, या शक्यतेने कंटेनर चालकाने बसला पाठीमागून थोडा धक्का लागल्यानंतर कंटेनर थेट लगतच्या इमारतीवर घातला. या इमारतीचे व इमारतीच्या खालील गाळ्यांचे आणि समोरील काही दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

कंटेनरचा समोरील भाग इमारतीला धडकल्याने अक्षरशः चक्काचूर झाला. मात्र, अपघातापूर्वीच कंटेनर चालकाने वाहनातून उडी मारल्याने तो बचावला असल्याचे या चौकातील वाहतूक पोलिसांनी सांगितले. दरम्यान, स्कूल बसमध्ये विद्यार्थी नव्हते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.

Back to top button