मिरची, लसूण, कांद्याची मोठी आवक, भाव स्थिर; एकूण उलाढाल 2 कोटी 40 लाख रुपये | पुढारी

मिरची, लसूण, कांद्याची मोठी आवक, भाव स्थिर; एकूण उलाढाल 2 कोटी 40 लाख रुपये

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण (ता. खेड) येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये हिरवी मिरची, कांदा व लसणाची आवक वाढली. कांदा, बटाटा व लसणाचे भाव या आठवड्यात स्थिर राहिले. हिरवी मिरची व टोमॅटोच्या भावात किंचित घसरण झाली. पालेभाज्यांच्या बाजारात पालकची मोठी आवक झाली. तर, मेथी, कोथिंबीर व शेपूची आवक घटली. जनावरांच्या बाजारात जर्शी गाई व बैलांच्या संख्येत मोठी घट झाली. म्हैस व शेळ्या-मेंढ्यांच्या संख्येत वाढ झाली. एकूण उलाढाल 2 कोटी 40 लाख रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक 2 हजार क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक 250 क्विंटलने वाढली व कमाल भाव 1,500 रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक 3 हजार क्विंटल होऊन कमाल भाव 2,220 रुपयांवर स्थिरावला. जळगाव भुईमूग शेंगा व बंदूक भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक 30 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक दुपटीने वाढली. कमाल भाव 4 हजार रुपयांवर स्थिरावला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 270 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक 5 क्विंटलने वाढल्याने भावात घसरण झाली. हिरव्या मिरचीला 3 हजार रुपयांपासून 4 हजार 500 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेतमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे
कांदा – एकूण आवक – 2,000 क्विंटल. भाव क्रमांक 1. 1,500 रुपये, भाव क्रमांक 2. 1,250 रुपये, भाव क्रमांक 3. 1,000 रुपये.
बटाटा – एकूण आवक – 3,000 क्विंटल. भाव क्रमांक 1. 2,200 रुपये, भाव क्रमांक 2. 1,950 रुपये, भाव क्रमांक 3. 1,700 रुपये.
फळभाज्या : फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतिदहा किलोसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढीलप्रमाणे :

टोमॅटो : 290 क्विंटल (500 ते 1 हजार रु.), कोबी – 185 क्विंटल (800 ते 1,200), फ्लॉवर – 152 क्विंटल (1 ते 2 हजार), वांगी – 111 क्विंटल (3 ते 5 हजार), भेंडी – 62 क्विंटल (2 ते 4 हजार), दोडका – 56 क्विंटल (4 ते 5 हजार), कारली – 64 क्विंटल (2,500 ते 3,500 रु.), दुधीभोपळा – 63 क्विंटल (1 ते 2 हजार), काकडी – 71 क्विंटल (1 ते 2 हजार), फरशी – 8 क्विंटल (10 ते 12 हजार), वालवड – 34 क्विंटल (4 ते 6 हजार), गवार – 54 क्विंटल (4,500 ते 5,500), ढोबळी मिरची – 118 क्विंटल (1,500 ते 4,500), चवळी – 29 क्विंटल (3 ते 4 हजार), वाटाणा – 100 क्विंटल (4 ते 6 हजार), शेवगा – 15 क्विंटल (3 ते 4 हजार), गाजर – 45 क्विंटल (2 ते 3 हजार).

पालेभाज्या : चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : मेथी – एकूण 13 हजार 850 जुड्या (1,000 ते 1,800 रुपये,), कोथिंबीर – एकूण 23 हजार 450 जुड्या (1 ते 2 हजार), शेपू – एकूण 2 हजार 450 जुड्या (600 ते 1,000), पालक – एकूण 2 हजार 100 जुड्या (500 ते 1,000).

जनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 64 जर्शी गाईंपैकी 45 गाईंची विक्री (15 ते 50 हजार), 82 बैलांपैकी 41 बैलांची विक्री (15 ते 35 हजार), 167 म्हशीपैकी 132 म्हशींची विक्री (25 ते 60 हजार), 5,850 शेळ्यापैकी 5,340 शेळ्यांची विक्री (2 ते 12 हजार).

Back to top button