पुणे : चांदणी चौकात अतिरिक्त वाहतूक मार्शल नेमा; हद्दीच्या वादावरून मुख्यमंत्र्यांनी सुनावले | पुढारी

पुणे : चांदणी चौकात अतिरिक्त वाहतूक मार्शल नेमा; हद्दीच्या वादावरून मुख्यमंत्र्यांनी सुनावले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मुख्यमंत्र्यांनी वाहतूक कोंडी टाळण्याच्या उपाययोजनेबाबत अधिकार्‍यांशी चर्चा केली. वाहतुकीचे नियोजन करताना जनतेला त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. वाहतूक नियोजनासाठी तातडीने अतिरिक्त वाहतूक मार्शल नेमण्यात यावेत. चौकातील पूल पाडल्यानंतर सर्व्हिस रोड तातडीने तयार करावा. गर्दीच्या वेळी शहरात येणार्‍या जड वाहनांची वाहतूक योग्यरीतीने नियंत्रित करावी. वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने आवश्यक कामे युद्धपातळीवर करावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

आधी मदत करा; हद्दीचा वाद नंतर सोडवा
चांदणी चौकात अपघात झाल्यास पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांमध्ये हद्दवादीचा प्रश्न निर्माण होतो. सर्वप्रथम अपघातग्रस्तांना मदत करावी. हद्दवादीचा प्रश्न नंतर सोडवा, अशा शब्दात  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिकार्‍यांना सुनावले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पुणे येथील चांदणी चौकाला दिलेल्या विशेष भेटीदरम्यान अधिकार्‍यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी रविवारी दुपारी मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौक परिसराला विशेष भेट दिली.

त्या वेळी त्यांनी चांदणी चौकातील वाहतूक कोडींची अधिकार्‍यांकडून माहिती घेतली. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी डॉ. राजेश शिंदे, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक संजय कदम, पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त अंकुश शिंदे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘मी इथून सातार्‍याकडे जात होतो, त्या वेळी येथील प्रवासी मला भेटले. त्यांनी येथील वाहतुकीची जी काही समस्या होती, ती माझ्या कानावर घातली. त्याचवेळी मी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, एनएचएआयचे अधिकारी या सर्व संबंधित विभागांशी फोनवरून संपर्क केला. या संपूर्ण टीमने या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे.

नागरिकांच्या तक्रारीची तातडीने दखल
मुख्यमंत्री सातार्‍याकडे जात असताना नागरिकांनी चांदणी चौक परिसरातील वाहतुकीची समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने या तक्रारीची दखल घेत अधिकार्‍यांना या भागाला भेट देऊन आवश्यक कामे तातडीने करण्याचे निर्देश शुक्रवारी दिले होते.

रिंगरोडचाही प्रश्न मार्गी लागणार
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराभोवतालून वर्तुळकार (रिंगरोड) रस्ता प्रस्तावित आहे. त्याचे भूसंपादनाचे काम सुरू झाले असून, त्यासाठी 250 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या रिंगरोडच्या नियोजनाविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती घेतली आहे. यासंदर्भात लवकरच बैठक घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Back to top button