जनावरांना तत्काळ द्या ‘लंपी स्किन’ प्रतिरोधक लस: पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांचे आवाहन | पुढारी

जनावरांना तत्काळ द्या ‘लंपी स्किन’ प्रतिरोधक लस: पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांचे आवाहन

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील मांडवी गावात 8 गायींना ‘लंपी स्किन’ या विषाणुजन्य त्वचारोगाची लागण झाल्याचे तपासात आढळून आले आहे. जनावरांना ताप येणे, चट्टे पडण्याची लक्षणे आढळून आली आहेत. या रोगावर लस उपलब्ध असून गायी, म्हशी या मोठ्या जनावरांचे तत्काळ लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांनी केले आहे. राज्यात सध्या अहमदनगर, धुळे या जिल्ह्यांत लंपी स्किन डीसीज या रोगांची मोठ्या प्रमाणात पशुधनास लागण होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच राजस्थान, गुजरातमध्ये या रोगांची मोठ्या प्रमाणात लागण होऊन पशुधनही दगावल्याचे समोर आल आहे.

महाराष्ट्रातही या रोगाची 2020 मध्ये पशुधनास लागण झाली होती. मात्र, वेळीच पशुसंवर्धन विभागाने उपाययोजना केल्याने त्या वेळी या रोगाची साथ आटोक्यात आणण्यात यश आले होते. जनावरांना ताप येण्यामुळे दूध उत्पादन घटण्याची शक्यता राहते. अशा जनावरांना प्रतिजैविके, इंजेक्शन इवरमेक्टिन व जनावरांना तापाची औषधे देणे आवश्यक आहे . या विषाणूजन्य रोगावर लस उपलब्ध आहे. जनावरांचे लसीकरण केल्यानंतर 15 ते 20 दिवसांत त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार होते. ही लस सर्वत्र उपलब्ध असून शेतकर्‍यांनी घाबरून न जाता आपापल्या जनावरांच्या लसीकरणास प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

अकोले तालुक्यातून शिरकाव…
जुन्नरमधील मांडवी परिसर हा नगरमधील अकोले तालुक्याला जवळ आहे. त्याच ठिकाणाहून या भागात लंपी स्किन डीसीजचा शिरकाव झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाने त्या ठिकाणी तत्काळ लसीकरण मोहीम राबवीत सुमारे 1450 जनावरांचे तत्काळ लसीकरण पूर्ण केले आहे. तसेच त्या ठिकाणी आवश्यक त्या किटकनाशकांची फवारणीही करण्यात आली आहे. पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी मांडवी गावास भेट देऊन लसीकरण मोहिमेची पाहणी करीत सर्व भागात तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. या वेळी पशुसंवर्धनचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. बी. विधाटे आदीही उपस्थित असल्याचे डॉ. मुकणे यांनी सांगितले.

अशी आहेत लक्षणे…
या रोगाच्या लक्षणांमध्ये जनावरांना प्राधान्याने ताप येतो आणि जनावर चारा खात नाहीत. शरीरावर एक रुपयाच्या नाण्याएवढे गोल चट्टे पडतात व त्या चट्ट्यांमध्ये पुढे जखमा होतात. काही प्रमाणात पुढे जनावरांचा मृत्यू होण्याची शक्यताही असते. या रोगाची लागण एका जनावरापासून दुसर्‍या जनावरास होते. ज्यामध्ये गोचिड, गोमाशाद्वारे या रोगाच्या विषाणूचा प्रसार होतो, असे ते म्हणाले.

 

Back to top button