पुणे : गुन्हे शाखेने पकडले साडेतीन लाखांचे धान्य | पुढारी

पुणे : गुन्हे शाखेने पकडले साडेतीन लाखांचे धान्य

पुणे; पुढारी वृत्तसेवा: सरकारी रेशनिंगचा तांदूळ पॉलिथीनच्या बॅगमध्ये भरून टेम्पोतून बेकायदा विक्री करण्यासाठी नेण्यात येत होता. गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक 1 ने हा टेम्पो पकडला. या वेळी टेम्पोसह तीन टन तांदूळ आणि गहू जप्त करण्यात आला. अंमलदार लष्कर पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिस नाईक विजय कांबळे यांना टेम्पोत तांदूळ भरून बेकादेशीररीत्या विक्रीसाठी जात असल्याचे समजले. त्यांनी व त्यांच्या पथकाने लागलीच सोलापूर रोडवरील भैरोबानाला येथे धाव घेऊन टॅम्पोचालकाला थांबवले.

या वेळी चालक मिझान गौसुद्दिन शेख (वय 28, रा. पर्वती पायथा, दत्तवाडी) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारणा केली असता, त्याने तांदूळ कासेवाडीतील जावेद शेख याच्या गोडाऊनमध्ये भरून यवत येथे घेऊन जात असल्याचे सांगितले. याबाबत भवानी पेठेतील जावेद शेख याच्याकडे चौकशी केल्यानंतर, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. दोघांवर वानवडी पोलिस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी तब्बल 3 लाख 48 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अभिजित पाटील करत आहेत.

Back to top button