निर्धार पर्यावरणपूरक उत्सवाचा! महापालिकेकडून कृत्रिम हौद, लोखंडी टाक्यांची व्यवस्था | पुढारी

निर्धार पर्यावरणपूरक उत्सवाचा! महापालिकेकडून कृत्रिम हौद, लोखंडी टाक्यांची व्यवस्था

पुणे; पुढारी वृत्तसेवा: यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा होण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना आणि उपक्रमांचे आयोजन केले आहे. या उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी होऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सवास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. महापालिकेच्या वतीने गणेशोत्सवादरम्यान मूर्ती विसर्जनासाठी विविध ठिकाणी कृत्रिम हौद, फिरते हौद, लोखंडी टाक्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती महापालिकेच्या www.pmc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार नागरिकांनी सोयीनुसार नजीकच्या ठिकाणी मूर्ती विसर्जित कराव्यात.

विविध ठिकाणी मूर्ती दान संकलन केंद्रे उभारण्यात येणार असून, त्याची माहिती वर नमूद संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आपल्या घरातून निघणारे निर्माल्य सार्वजनिक ठिकाणी किंवा नदी, तलावात न टाकता ते पालिकेच्या यंत्रणेकडे सुपूर्त करावे. यासाठी सर्व मूर्ती संकलन, दान केंद्रांवर निर्माल्य संकलनाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. निर्माल्य वर्गीकरण करूनच देण्यात यावे व निर्माल्यामध्ये इतर प्रकारचा कोणताही कचरा येणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे घरातील दैनंदिन कचरा संकलनासाठी येणार्‍या सेवकाकडेही निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

पुनरावर्तन उपक्रमाचे आयोजन
विविध स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने महापालिकेकडून यंदा पुनरावर्तन हा नावीन्यपूर्ण उपक्रम आयोजित केला जाणार आहे. यामध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती किंवा घरी मूर्ती विसर्जन केल्यास उरणारी शाडूची माती संकलित केली जाऊन त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. सर्व मूर्ती दान केंद्राच्या ठिकाणी शाडू मातीचे संकलन करण्यासाठी व्यवस्था असणार आहे.

यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक होण्यासाठी नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या गणेशमूर्तीऐवजी शाडू माती व पर्यावरणपूरक पद्धतीने बनविलेल्या मूर्तीचा वापर करावा, गणेशमूर्तींचे विसर्जन कोणत्याही नैसर्गिक जलस्रोतात न करता घरीच करावे, गणेशमूर्ती विसर्जनाऐवजी मूर्ती दान करण्यास प्राधान्य द्यावे, तसेच सजावट करताना सिंगल युज प्लास्टिक व थर्माकोलचा वापर न करता पुनर्वापर करता येईल अशा पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करावा.

                                                                     – डॉ. कुणाल खेमनार,                                                             अतिरिक्त महापालिका आयुक्त आरोग्य विभागही सज्ज

Back to top button