‘स्वरसंध्या’ने पुणेकर रसिक रोमांचित; गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर रंगलेल्या मैफलीला उत्स्फूर्त दाद | पुढारी

‘स्वरसंध्या’ने पुणेकर रसिक रोमांचित; गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर रंगलेल्या मैफलीला उत्स्फूर्त दाद

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ’स्वरसंध्या’ कार्यक्रम खरंच खूपच अप्रतिम आहे… अगदी एक नंबर..! काय अफलातून गातात हे लिट्ल चॅम्प्स…’ अशी भरभरून मनसोक्त दाद पुणेकर रसिक प्रेक्षकांनी दिली आणि या कार्यक्रमाने रसिक अक्षरश: रोमांचित झाले. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर दै. ‘पुढारी’ आयोजित तसेच पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, सांस्कृतिक नगरी यांच्यातर्फे घेण्यात आलेला हा कार्यक्रम अक्षरशः हाऊसफुल्ल केला. झी मराठी लिट्ल चॅम्प्स अनया देसाई, गौरी गोसावी, धीरज शेगर यांनी ही ‘स्वरसंध्या’ची मैफल अधिक रंगतदार केली.

‘गणाधीशा भालचंद्रा, जय शारदे वागेश्वरी’ या गाण्याने कार्यक्रमाचा श्रीगणेशा झाला. त्यानंतर ‘पाऊले चालती पंढरीची वाट’, ‘खेळ मांडला’, ‘जिवा-शिवाची बैलजोड’ ते ‘आवाज वाढव डीजे’ या गाण्यांनी सभागृहातील उत्साह आणखी दुणावला. लिट्ल चॅम्प्सच्या आवाजाची जादू पुणेकर रसिक प्रेक्षकांनी प्रत्यक्ष अनुभवली. या छोट्या बालकलाकारांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सलग तीन तास चाललेल्या या कार्यक्रमाची जादू उत्तरोत्तर रंगत गेली. छोट्या बच्चेकंपनीपासून ते आजी-आजोबांपर्यंत सर्वांनीच या कार्यक्रमाचा आनंद लुटला.

या कार्यक्रमात प्रेक्षक म्हणून सहभागी झालेली सातवर्षीय मयरा शिंदे म्हणाली, ‘या तिन्ही ताई-दादांनी खूप सुंदर गाणी गायली. मला हा कार्यक्रम खूप खूप आवडला.’ स्वरसंध्या कार्यक्रमात पुणे आणि आसपासच्या अनेक शाळांतील मुलांनी आपला सहभाग नोंदवला. यात प्रामुख्याने अरण्येश्वर विद्यालय अरण्येश्वर, प्रियदर्शनी विद्यालय धनकवडी, पुणे महानगरपालिकेची प्रकाश पवार भामरे शाळा, विद्यानिकेतन विद्यालय बिबवेवाडी, सरिता विद्यालय पर्वती, गुलाबबाई कटारिया प्राथमिक शाळा, शिंदे हायस्कूल सहकारनगर, विद्याविकास विद्यालय, अंगणवाडी शिक्षिका कर्वेनगर विभाग, अष्टविनायक बचत गट वारजे, एसपी इंटरनॅशनल स्कूल आंबेगाव पठार, चाटे स्कूल तळजाई पठार, सद्गुरू घावरे अपार्टमेंट, आंबेगाव बुद्रुक या शाळांचा सहभाग होता. दरम्यान, दै. ‘पुढारी’च्या महिलांचे हक्काचे व्यासपीठ असणार्‍या कस्तुरी क्लबतर्फे लकी कूपन्स काढण्यात आली. यात ऊर्मिला ढेकणे, जयमाला जांभवराव, अश्विनी जगताप, स्नेहा गुरुगारी, अरुण बनारसे, उज्ज्वला देशपांडे, मंजूषा लडकत, रश्मी वैद्य, शेख अमीर, नेहा पासलकर, अश्विनी देवडीकर, स्मिता आपटे, रोहिणी पुरोहित, नलिनी पिल्ले या विजयी ठरल्या.

लिट्ल चॅम्प्स म्हणतात…
अनया देसाई : ‘स्वरसंध्या’ हा कार्यक्रम खूप आवडला. एवढा मोठा ऑडिटोरियम आणि एवढा मोठा प्रेक्षकवर्ग पहिल्यांदाच अनुभवायला मिळत आहे. खूप शिकायला मिळालं. झी मराठी आणि दैनिक ‘पुढारी’ने आयोजित केलेला हा कार्यक्रम आपलासा वाटला.
गौरी गोसावी : ‘स्वरसंध्या’च्या व्यासपीठाच्या माध्यमातून झी मराठीला मी धन्यवाद देते. कारण, लिट्ल चॅम्प्समुळे मला राज्यभरात विविध शहरे फिरायला मिळतात. पुण्यात पहिल्यांदाच हा कार्यक्रम होतो आहे. मी खूप एक्साईट आहे.
धीरज : ‘सारेगमप’नंतर पहिलाच कार्यक्रम मला सादर करायला मिळालाय. पुण्यात येऊन गाणं खूप छान वाटतंय.
सचिन जगताप (संचालक, जीवन गाणे वाद्यवृंद) : लिट्ल स्टारबरोबर वाद्यवृंदाची साथ करताना आम्हालाही या बच्चेकंपनीकडून नव्याने शिकायला मिळतंय. त्यांच्यातला आत्मविश्वास आम्हालाही नवी उमेद देतोय. पुण्यात पहिल्यांदाच दैनिक ‘पुढारी’च्या माध्यमातून मुलांना एक व्यासपीठ मिळाले आहे. या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा.

गणेशाची स्थापना आता लवकरच होत आहे. त्याच्या दोन दिवस आधीच ही सांगीतिक पर्वणी पुणेकरांना मिळते, त्याचा आनंद आहे. दैनिक ‘पुढारी’ नेहमी असा चांगला समाजोपयोगी कार्यक्रम सादर करीत आला आहे. त्यामुळे त्याला आमचा कायम पाठिंबा राहील.
                                                              – हर्षल झोडगे,
                सहायक क्षेत्रीय प्रबंधक, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी

 

मला हा कार्यक्रम खूप जास्त आवडला. आमचा कायम पाठिंबा राहील.
– शुभ प्रदीप घोष
(सीनिअर, ए. एस. एम.,
केओ कार्पिन) :

Back to top button