पुणे जिल्ह्यात साडेचार हजार दिव्यांग; जिल्हा परिषदेने राबवली सर्वेक्षण मोहीम | पुढारी

पुणे जिल्ह्यात साडेचार हजार दिव्यांग; जिल्हा परिषदेने राबवली सर्वेक्षण मोहीम

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दिव्यांग व्यक्तींना मदत आणि लाभ मिळावे म्हणून त्यांची ओळख पटविण्यासाठी जिल्हा परिषदेने सर्वेक्षण केले. आशा वर्करमार्फत ग्रामीण भागातील सव्वानऊ लाख घरांना भेटी देण्यात आल्या. यात 4 हजार 532 नवीन दिव्यांग व्यक्ती आढळून आल्या. जिल्हा परिषद जिल्ह्यातील विविध ठिकाणी शिबिरे आयोजित करणार असून, अपंगत्व आणि त्याची टक्केवारी तपासण्यासाठी अशा शिबिरांना वैद्यकीय मंडळ पाठवण्यात येणार आहे. आशा वर्करना अपंगत्वाची चिन्हे ओळखण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले होते.  आशा कार्यकर्त्यांनी 9 लाख 27 हजार घरांना भेटी दिल्या.

घरातील अपंग व्यक्ती, अपंगत्वाचा प्रकार, वय आदी बाबींची माहिती घेण्यात आली. अपंग व्यक्ती प्रमाणित झाल्यानंतर अपंग पुनर्वसन केंद्रामध्ये उपचारात्मक आणि शस्त्रक्रिया सेवांद्वारे आवश्यक सहाय्य प्रदान केले जाईल. श्रवणयंत्र, चष्मा, जयपूर फूट इत्यादी उपकरणे योजनांच्या माध्यमातून वितरित करण्यात येतील. दिव्यांग व्यक्तींना कौशल्य प्रशिक्षण, अपंग निवृत्ती वेतन, बस पास, विशेष नोकरी प्लेसमेंट समर्थन आदीचा लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. 4 हजार 532 नवीन दिव्यांग व्यक्ती आढळल्या असून, त्यापैकी 950 व्यक्तींकडे दिव्यांग प्रमाणपत्र आहे.

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करताना त्यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. पुढील टप्प्यात त्यांना शासनाच्या विविध योजनांचा आणि आरोग्य सुविधांचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. आशा कार्यकर्तींनी केलेले सर्वेक्षणाचे काम कौतुकास्पद आहे.
                                           -आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.

Back to top button