पिंपरी : ढोल-ताशा तयार करण्यात कारागीर व्यस्त | पुढारी

पिंपरी : ढोल-ताशा तयार करण्यात कारागीर व्यस्त

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : यंदा दोन वर्षानंतर निर्बंधाविना मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेशोत्सव म्हटला की, मोठा उत्साह. दहा दिवस मंडळांच्या गणपतीसमोर ढोल आणि ताशांचा दणदणाट असतो. अशा या उत्सवाच्या तयारीसाठी कारागिरांकडून ढोल ताशा व हलगी तयार करण्याचे काम सुरू आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे मिरवणुका आणि ढोल ताशा पथकांना परवानगी नव्हती. त्यामुळे ढोल ताशा कारागिरांचे व्यवसाय ठप्प झाले होते.

मात्र, यावर्षी सण साजरे करण्यांवर कोणतेही निर्बंध नसल्याने यावर्षी ढोल ताशांचा आवाज घुमणार आहे. पिंपरी चिंचवड शहरात निगडी, पिंपरी, दापोडी याठिकाणी ढोल ताशा कारांगिरांचे काम जोरात सुरू आहे. कोरोनामुळे दोन वर्षे ढोल ताशा पथकांना वादनाचा सराव करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे ढोल ताशांची विक्रीच झाली नाही. त्यामुळे कारागिरांना व्यवसायामध्ये तोटा सहन करावा लागला. ढोल ताशा तयार करणार्‍या कारागिरांना गणेशोत्सवातच कमाईची संधी असते. वर्षातून एकदा येणारी ही संधी वर्षभराची कमाई करून देत असते. गेली दोन वर्षे यावर पाणी फिरले होते.

यंदा ढोल ताशा कारागिरांमध्ये उत्साह आहे. कारण शहरातील अनेक मोठ्या ढोल ताशा पथकांकडून ढोल ताशा खरेदी केली जात आहे. कारागिरांकडे प्लास्टिक, फायबर आणि चामड्यापासून तयार केलेले ढोल ताशा व हलगी विक्रीस ठेवण्यात आले आहेत. यामध्ये फायबरपासून तयार केलेले ढोल 2600 तर चामडीपासून तयार केलेले ढोल 3600 रूपयांपासून उपलब्ध आहेत. तर पितळी ताशा 6 हजार 500 आणि स्टिलचा ताशा 1500 रूपये पासून पुढे आहे. यंदा जीसएसटीमुळे कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या. त्यामुळे 25 ते 30 टक्के दरवाढ झाली आहे, असे एका विक्रेत्यांनी सांगितले.

Back to top button