पुण्यात अजित पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस; महापालिकेची निवडणूक लक्षवेधी ठरणार | पुढारी

पुण्यात अजित पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस; महापालिकेची निवडणूक लक्षवेधी ठरणार

ज्ञानेश्वर बिजले
पुणे : भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे आजी-माजी उपमुख्यमंत्री पुण्यात थेट लक्ष घालत असल्याने महापालिकेची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करताना पवार यांनी गेल्या अडीच वर्षांत पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांच्या हद्दीत पक्षबांधणी केली. राष्ट्रवादीच्या दृष्टीने राज्यात याच दोन महापालिका महत्त्वाच्या आहेत. सत्ताबदलानंतर फडणवीस यांनी राज्यातील निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले. ते मुख्यमंत्री असताना पाच वर्षांपूर्वी भाजपने अनेक महापालिका जिंकल्या. त्यात पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता त्यांनी हिसकावून घेतली.

राष्ट्रवादीला शह देण्यासाठी फडणवीस या दोन्ही महापालिकांच्या निवडणुकांवर प्रथमपासून नजर ठेवून राहतील, असे भाजपमधील सूत्रांचे म्हणणे आहे. चंद्रकांत पाटील कोथरूडमधून निवडून आले. त्यांच्यासोबत खासदार गिरीश बापट, अन्य आमदार, महापालिकेत निर्माण झालेले नवे नेतृत्व, प्रभागरचनेनंतर प्रत्येक भागांत असलेले सक्षम स्थानिक नेतृत्व यांमुळे भाजपचे पारडे जड असल्याचे दिसून येते.फडणवीस पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढविणार की पुण्याचे पालकमंत्री होणार, अशी चर्चा रंगू लागली आहे. सध्यातरी तसे होण्याची शक्यता कमी असली, तरी राष्ट्रवादीला जिल्ह्यात रोखण्यासाठी फडणवीस पुण्यातील उमेदवार निवडीमध्ये लक्ष घालतील, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येतो.

निवडून येण्याची क्षमता व पक्षाने केलेले सर्वेक्षण या निकषावरच उमेदवार निवडीकडे त्यांचा कटाक्ष राहील. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची आघाडी होईल, असे राष्ट्रवादीचेे स्थानिक नेते सांगत आहेत. या आघाडीत स्थानिक पातळीवर काँग्रेसही सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यांच्यात जागावाटप हाच कळीचा मुद्दा ठरेल. नगरसेवक व गेल्या निवडणुकीत दुसर्‍या स्थानी असलेल्या उमेदवाराची जागा ही त्या पक्षाकडे सोपविण्यात येईल.

तसे केल्यास शिवसेनेला किमान 34 व काँग्रेसला 26 जागा मिळू शकतात. त्यात वाढ करण्याची दोन्ही पक्षांची मागणी राहील. जागावाटप नीट झाल्यास महाविकास आघाडी तुल्यबळ लढत देण्याच्या स्थितीत असेल. राष्ट्रवादी स्वबळावर लढल्यास हडपसर, वडगाव शेरी मतदारसंघात त्यांची आघाडी राहील. मात्र, प्रमुख चार पक्षांसह अन्य पक्षही रिंगणात असल्यास मतविभागणीचा फायदा भाजपला अधिक होईल.

गेल्या पाच वर्षांत शहराचा विकास झाला नाही. 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन आमदार निवडून आले. पक्षाची सर्व ठिकाणी ताकद वाढली आहे. शिवसेनेसोबत आघाडी होईल. भाजपचा आलेख घसरत चालल्याने या वेळी महाविकास आघाडी सत्तेवर येईल व राष्ट्रवादीचाच महापौर होईल.
                                                         प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी

सर्वच पक्ष स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे. गेल्या आठ वर्षांत विविध निवडणुकांत भाजपची मताची टक्केवारी घटली नाही. ती 34 ते 39 टक्के राहिली आहे. त्यामुळे भाजप या वेळी स्वबळावर महापालिकेत सत्तेवर येईल. राष्ट्रवादी आजपर्यंत कधीही स्वबळावर सत्तेवर आलेली नाही.
                                               गणेश बिडकर, माजी सभागृहनेते, भाजप

Back to top button