पुणे : मीटर आले, गळती घटली अन् पाणीपुरवठा वाढला; काम पूर्ण झाल्यानंतर मिळालेली माहिती | पुढारी

पुणे : मीटर आले, गळती घटली अन् पाणीपुरवठा वाढला; काम पूर्ण झाल्यानंतर मिळालेली माहिती

पुणे : समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत कळस येथील गणेशनगर आणि म्हस्के वस्तीसह 12 झोनमध्ये पाणी मीटर बसविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या भागात मीटर बसविल्यानंतर पाणी गळती कमी झालीच, याशिवाय नागरिकांनाही पूर्वीपेक्षा अधिक आणि समाधानकारक पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. जून 2023 पर्यंत या योजनेचे काम पूर्ण होणार असून, त्यानंतर सद्यस्थितीला असलेली 35 ते 40 टक्के पाणी गळती 20 टक्क्यांपर्यंत कमी होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. महापालिकेच्या वतीने शहरात समान पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या सद्यस्थितीची माहिती प्रशासनाकडून मंगळवारी देण्यात आली.

या वेळी आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, अतिरिक्त नगर अभियंता श्रीनिवास बोनाला, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आयुक्तांनी या योजनेच्या कामाची माहिती देताना सांगितले की, कळस येथील गणेशनगर आणि म्हस्के वस्ती येथे मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नक्की काय बदल झाला, याचा अभ्यास करण्यात आला. या परिसरात पूर्वी दरडोई साधारण 100 लिटर पाणीपुरवठा होत असे. मीटर बसविल्यानंतर दरडोई सरासरी 165 ते 175 लिटर पाणीपुरवठा होऊ लागला आहे. त्याचबरोबर गळतीही कमी झाल्याचे आढळून आले.

दरम्यान, या योजनेच्या कामाच्या सद्यस्थितीची माहिती देताना पावसकर म्हणाले, ‘आतापर्यंत मीटर बसविण्याचे 20 टक्के काम पूर्ण झाले आहे. शहरात 3 लाख 18 हजार मीटर बसविण्यात येणार आहेत. मीटर बसविण्यासाठी 152 झोन तयार करण्यात आले असून, त्यापैकी 12 झोनमध्ये काम पूर्ण झाले असून 30 झोनमधील काम अंतिम टप्प्यात आले आहे. उर्वरित झोनमध्येही सध्या दररोज 500 मीटर बसविण्यात येत असून लवकरच हे प्रमाण एक हजारपर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’

यासोबतच झोननिहाय स्काडा सिस्टिम बसविण्यात येणार असून प्रत्येक चार तासांनी किती पाणी वापरले याचे अपडेटस् सर्व्हर रुममध्ये संगणकावर पाहायला मिळणार आहेत. यासोबतच मीटर खराब असल्यास, एखाद्या कनेक्शनवरून अधिकचा पाणी वापर झाल्यास बसल्या ठिकाणी माहिती मिळणार असून, त्यामुळे दुरुस्ती व सुपरव्हिजन करणे सोपे होणार आहे.

पाण्याच्या व्हॉल्व्हचे संचलनही ऑटोमेटिक
पाणीपुरवठा यंत्रणेचे ऑटोमायजेशन करण्याच्या दृष्टीने महापालिका आणखी काही प्रयत्न करत आहे. पुढील टप्प्यामध्ये शहरातील विविध भागांत असलेल्या सुमारे 500 व्हॉल्व्हचे संचलनही अत्याधुनिक यंत्रणेमार्फतच करण्याचा प्रयत्न आहे. सध्या मॅन्युअली चावी सोडण्यासाठी कर्मचार्‍यांची नियुक्ती करावी लागते. व्हॉल्व्ह सोडण्याच्या वेळेबाबत आणि दाबाबाबतही सातत्याने तक्रारी होत असतात. यामुळे आगामी काळात सर्वच ठिकाणी अत्याधुनिक व्हॉल्व्ह बसवून त्याचे संचलनही सर्व्हर रुममधूनच करण्याची व्यवस्था उभारण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

Back to top button