मुक्या जनावरांना ते दररोज देतात अन्न | पुढारी

मुक्या जनावरांना ते दररोज देतात अन्न

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रस्ता परिसरातील हिंगणे खुर्द, विश्रांतीनगर, महादेवनगर, आनंदविहार तसेच मुठा कॅनॉल ब्रीज परिसरात भटक्या कुत्र्यांसह इतर प्राणी व पक्ष्यांना ते दररोज खाद्य देतात. एखादा प्राणी आजारी आढळल्यास त्याच्यावर मायेने उपचार करतात. बाळासाहेब प्रताप असे गेल्या आठ वर्षांपासून अशी अनोखी भूतदया बाळगणार्‍या व्यक्तीचे नाव आहे.

प्रताप हे प्रभूकृपा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आहेत. ते स्वखर्चाने भटकी जनावरे, पशु-पक्ष्यांसाठी मांस, खाद्य पदार्थ, बिस्किट विकत आणतात. दररोज संध्याकाळी साडेपाच ते साडेसातपर्यंत ते ठिकठिकाणी थांबून कुत्र्यांना खाद्य देत आहेत, तर पक्ष्यांना सकाळी खाद्य, अन्नधान्य देतात. शंभराहून अधिक कुत्र्यांना खाद्य दिले जात आहे. आजारी कुत्र्यांवर ते स्वखर्चाने उपचारही करत आहेत. प्रताप यांच्या या अनोख्या भूतदयेचे कौतुक होत आहे.

Back to top button