पुणे : प्रवासी सेवेसाठी 37 मेट्रो ट्रेन; ताफ्यात 7 गाड्या दाखल; तीन इटलीहून, तर 4 कोलकात्यातून | पुढारी

पुणे : प्रवासी सेवेसाठी 37 मेट्रो ट्रेन; ताफ्यात 7 गाड्या दाखल; तीन इटलीहून, तर 4 कोलकात्यातून

पुणे; पुढारी वृत्तसेवा: संपूर्ण पुणे शहरात पूर्ण क्षमतेने मेट्रोची सेवा सुरू झाल्यानंतर तब्बल 34 ट्रेनद्वारे प्रवासी वाहतूक सेवा पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांंचा लांब पल्ल्याचा प्रवास पीएमपी बसपेक्षा कमी वेळात होणे शक्य आहे. पुणे शहरातील मेट्रोचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. मार्च 2023 पर्यंत संपूर्ण क्षमतेने वनाज-रामवाडी आणि पिंपरी-स्वारगेट या दोन मार्गांवर मेट्रो धावणार आहे. त्यामुळे स्थानके, डेपो आणि मेट्रो मार्गांची राहिलेली कामे महामेट्रो प्रशासनाकडून युध्दपातळीवर सुरू आहेत.

त्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना सेवा पुरविण्याकरिता मेट्रो ट्रेन पुणे शहरात दाखल होत आहेत. नुकताच मेट्रोचा एक रॅक ताफ्यात दाखल झाला आहे. ‘आतापर्यंत एकूण 7 ट्रेन पुण्यात दाखल झाल्या असून, आणखी 28 ट्रेन पुण्यात लवकरच येतील. ताफ्यात दाखल झालेल्या 7 पैकी 3 ट्रेन मेट्रो प्रशासनाने इटलीहून आणल्या आहेत, तर 4 ट्रेन कोलकाता येथून आणलेल्या आहेत. यापुढे येणार्‍या 28 ट्रेन कोलकाता येथूनच येतील,’ असे मेट्रो प्रशासनाने सांगितले.

रेंज हिल आणि हिल व्ह्यू पार्क डेपोत पार्किंग, देखभाल
मेट्रोच्या ताफ्यात दाखल होणार्‍या या 34 मेट्रो ट्रेनचे पार्किंग, देखभाल दुरुस्ती कोथरूड वनाज येथील हिल व्ह्यू पार्क कारशेड आणि कृषी महाविद्यालय येथील रेंज हिल डेपो येथे होणार आहे.

अशी आहे मेट्रो ट्रेन
ट्रेनला 3 कोच (डबे) असणार
कोचची लांबी – 30 मीटर
ट्रेनची क्षमता – 900 प्रवासी
कोचची क्षमता – 300 प्रवासी

मेट्रोच्या ताफ्यात आतापर्यंत 7 ट्रेन दाखल झाल्या आहेत. एकूण 34 ट्रेनद्वारे पुणेकरांना सेवा पुरविण्यात येणार आहे. 3 ट्रेन इटलीहून आणल्या असून, उर्वरित ट्रेन कोलकाता येथून येत आहेत. कोलकाता येथून तयार होऊन येणार्‍या सर्व ट्रेनमधील 60 टक्क्यांपेक्षा अधिक पार्ट भारतीय बनावटीचे असणार आहेत. या ट्रेनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
                                               – हेमंत सोनावणे, महाव्यवस्थापक, महामेट्रो

Back to top button