पुणे : वाहतूक पोलिसांकडून हरवलेली पर्स परत | पुढारी

पुणे : वाहतूक पोलिसांकडून हरवलेली पर्स परत

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दुचाकीवरून जाताना रस्त्यावर एका महिलेची पर्स वाहतूक पोलिसांना आढळली. त्यांनी संबंधित महिलेचा शोध घेऊन ती पर्स परत केली. आपली हरवलेली पर्स परत मिळाल्याचे पाहून त्या दाम्पत्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. बाणेर परिसरातील चाकणकर मळ्यात वास्तव्यास असलेल्या प्रियंका परदेशी आपल्या पतीसह दुचाकीवरून रात्री आठच्या सुमारास घरी निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांची पर्स रस्त्यावर पडली. त्यांनी घरी जाऊन पाहिले तेव्हा ती पर्स मिळून आली नाही.

पर्समध्ये रोकड व सोन्याचे दागिने असा 60 हजार रुपयांचा ऐवज होता. दरम्यान, चतुःशृंगी वाहतूक विभागाचे सहायक पोलिस उपनिरीक्षक सुभाष पिंपळे, धनाजी काकडे पोलिस हवालदार मनोज शितोळे हे वाहतूक नियमन करत असताना त्यांना ती पर्स मिळून आली. त्यांनी ती उघडून पाहिली असता, रोकड व सोन्याचे दागिने असल्याचे दिसले.

तसेच काही कागदपत्रेदेखील होती. त्याच्यावर परदेशी यांचे नाव लिहिलेले होते. संपर्क क्रमांक नसल्यामुळे त्यांनी एटीएम कार्डवरून त्यांचा पत्ता शोधून पर्स परत करण्याचे ठरवले. काही वेळानंतर परदेशी त्यांच्या पतीसह रस्त्याने पर्स शोधत येत असल्याचे पोलिसांना दिसले. त्यांनी पर्सबाबत पोलिसांना विचारले असता, खात्री करून मिळून आलेली पर्स ही परदेशी यांची असल्याचे समजल्यानंतर त्यांना ती परत करण्यात आली.

Back to top button