निरा डावा कालव्याचे लवकरच अस्तरीकरण; पाझर बंद होण्याच्या शक्यतेने शेतकरी हवालदील | पुढारी

निरा डावा कालव्याचे लवकरच अस्तरीकरण; पाझर बंद होण्याच्या शक्यतेने शेतकरी हवालदील

भवानीनगर; पुढारी वृत्तसेवा: बारामती तालुक्यातील कन्हेरी गावापासून निरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे कालव्यालगतच्या किमान दोन किलोमीटरपर्यंतच्या विहिरींची पाणीपातळी घटण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. निरा डावा कालव्याला आवर्तन सुटल्यानंतर कालव्यातील पाणी पाझरून किमान दोन किलोमीटरपर्यंतच्या शेतकर्‍यांच्या विहिरींच्या पाण्याची पातळी टिकून राहण्यास मदत होते. परंतु, निरा डाव्या कालव्याचे प्लास्टिकचा कागद टाकून काँक्रिटीकरणाने अस्तरीकरण करण्यात येणार असल्याने कालव्यातील पाणी पाझरण्याची शक्यता दुरावली आहे. परिणामी विहिरींची पाणी पातळी टिकणे अवघड होणार आहे. परिणामी शेती व्यवसाय अडचणीत येण्याची शक्यता आहे.

कालव्यातील पाण्याचा पाझर शेतकर्‍याच्या विहिरीपर्यंत आला नाही तर शेतकर्‍यांना बारमाही पिके घेण्यामध्ये अडचण निर्माण होणार आहे. निरा डाव्या कालव्याच्या लगत कालव्यापासूनच्या किमान आठ ते दहा किलोमीटरच्या अंतरातील अनेक शेतकर्‍यांनी कालव्यालगतच्या शेतकर्‍यांची एक दोन गुंठे जमीन घेऊन विहिरी खोदून त्या विहिरीतून पाणी उचलून नेऊन शेती बागायत केली आहे. परंतु, कालव्याचे अस्तरीकरण झाल्यानंतर या शेतकर्‍यांची शेती अडचणीत येणार आहे. सध्या निरा डावा कालव्याच्या परिसरातील अनावश्यक झाडे झुडपे काढण्याचे काम सुरू झाले आहे. त्यानंतर कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामाला सुरुवात होण्याची चिन्हे आहेत.

याबाबत कन्हेरी गावचे माजी सरपंच सतीश काटे म्हणाले की, कालव्याच्या अस्तरीकरणाला विरोध करण्यासाठी समिती तयार करण्यात आली आहे. अस्तरीकरणासाठी जलसंपदा विभाग सज्ज झाला आहे. कन्हेरी गावापासून अस्तरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. अस्तरीकरणामुळे कालव्यातील पाण्याचा पाझर पूर्णत: बद होणार आहे. त्यामुळे विहिरी, विंधन विहिरी कोरड्या पडणार आहेत. त्याचा फटका शेतीला बसणार आहे. यासंदभार्त चर्चा करण्यासाठी शुक्रवारी (दि. 19) सकाळी दहा वाजता कन्हेरी येथील मारुती मंदिरात शेतकर्‍यांची बैठक आयोजित केली आहे.

Back to top button