पुणे : खड्ड्यांचा ‘दणका’ अधिकार्‍यांना; कारणे दाखवा नोटीस देणार | पुढारी

पुणे : खड्ड्यांचा ‘दणका’ अधिकार्‍यांना; कारणे दाखवा नोटीस देणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दोषदायित्व कालावधीतील (डिफेक्ट लायबिलिटी पीरियड-डीएलपी) रस्त्यांची माहिती देण्याचे आयुक्तांनी आदेश देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या क्षेत्रीय कार्यालयांच्या सहायक आयुक्तांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. महापालिकेच्या पथ विभागाकडून 1 जून ते 18 ऑगस्ट या कालावधीत 11 हजार 418 खड्डे बुजविल्याचा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे शहरातील रस्त्यांवर अद्यापही खड्ड्यांचे साम्राज्य दिसते. पावसाळ्यापूर्वी महापालिकेकडून विविध पावसाळी कामे करण्यासोबतच रस्त्यांचीही दुरुस्ती केली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली होती.

मात्र, पहिल्याच पावसात शहरातील लहान मोठ्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले. या खड्ड्यांमुळे शहरातील वाहतूक मंदावून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागल्याने प्रशासनावर टीका झाली. यानंतर ठेकेदारांवर कारवाई करण्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत रस्त्यांची तपासणी करून त्याचा अहवाल मागवण्यात आला. ही तपासणी केवळ मुख्य पथ खात्याच्या अखत्यारित असलेल्या 139 डीएलपी रस्त्यांची करण्यात आली. त्यातही केवळ 17 रस्त्यांवरच जास्त खड्डे पडल्याचा आणि ते खड्डे विविध कामे केल्यानंतर योग्य प्रकारे पूर्ववत न केल्याने पडल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

शहरातील 12 मीटरपेक्षा कमी रुंदीचे रस्ते क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत येत असल्याने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी गेल्या तीन वर्षांत केलेल्या व डीएलपीमध्ये असलेल्या रस्त्यांची माहिती पाठवण्याचा आदेश क्षेत्रीय कार्यालयांना दिला होता. त्यानंतर 15 पैकी 10 क्षेत्रीय कार्यालयांनी डीएलपीमधील 1 हजार 325 रस्त्यांची माहिती सादर केली आहे. उर्वरीत क्षेत्रीय कार्यालयांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली असून अद्याप माहिती पाठविलेली नाही. या पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावून वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली जाणार असल्याचे डॉ. खेमनार यांनी सांगितले.

माहिती न देणारी क्षेत्रीय कार्यालये
नगररस्ता-वडगाव शेरी, येरवडा-धानोरी-कळस, ढोले पाटील, धनकवडी-सहकारनगर, भवानी पेठ

या क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश
अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशानंतर तीन वर्षांत काम केलेल्या 1 हजार 325 ‘डीएलपी’तील रस्त्यांची 10 क्षेत्रीय कार्यालयांनी माहिती सादर केली आहे. त्यामध्ये सिंहगड रस्ता – 651, वारजे कर्वेनगर -150, कोंढवा येवलेवाडी -110, औंध-बाणेर – 93, कोथरूड-बावधन – 81, वानवडी-रामटेकडी – 68, हडपसर-मुंढवा – 58, बिबवेवाडी – 52, कसबा विश्रामबाग – 51, शिवाजीनगर-घोले रस्ता – 11 कि.मी. रस्त्यांचा समावेश आहे.

Back to top button