जमिनीला मिळाले एकरी 2 कोटी 80 लाख; रिंगरोड भूसंपादनासाठी मावळ तालुक्यात पहिले खरेदीखत | पुढारी

जमिनीला मिळाले एकरी 2 कोटी 80 लाख; रिंगरोड भूसंपादनासाठी मावळ तालुक्यात पहिले खरेदीखत

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : पुणे- पिंपरी-चिंचवड शहराची वाहतूक कोंडीतून मुक्तता होण्याबरोबरच जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाच्या ठरणार्‍या रिंगरोडसाठी पहिले खरेदीखत (जमिनीचा अवॉर्ड) मावळ तालुक्यातील उर्से गावात झाले असून, संबंधित शेतकर्‍याला एकरी तब्बल 2 कोटी 80 लाख रुपयांचा विक्रमी मोबदला मिळाला आहे. गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाला यामुळे खर्‍या अर्थाने गती मिळणार आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी व जिल्ह्याच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने (एमएसआरडीसी) रिंगरोडचे काम हाती घेण्यात आले आहे. पूर्व आणि पश्चिम असे दोन टप्प्यात हा रिंगरोड करण्यात येणार आहे. सन 2007 मध्ये रिंगरोडचे नियोजन करण्यात आले होते. राजकीय इच्छाशक्तीच्या व निधीअभावी पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हा प्रकल्प कागदावरच राहिला होता. जिल्ह्यातील सुमारे सहा राष्ट्रीय महामार्गांना जोडणार हा रिंगरोड सुमारे 173 किलोमीटर असून, तब्बल 26 हजार 831 कोटींच्या प्रकल्पाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुढाकार घेत पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग प्रमाणे रिंगरोड प्रकल्पाला देखील गती दिली. दीड वर्षातच पूर्व आणि पश्चिम रिंगरोडसाठी आवश्यक असलेल्या जमिनीची मोजणी प्रक्रिया 99 टक्के पूर्ण झाली असून, पश्चिम रिंगरोडचे दरदेखील निश्चित झाले. एवढेच नाही तर विक्रमी वेळेत रिंगरोडसाठी आता थेट भूसंपादन प्रक्रियादेखील सुरू झाली आहे.

या सहा राष्ट्रीय महामार्गांना जोडणार
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील प्रमुख सहा राष्ट्रीय महामार्गांना हा रिंगरोड जोडणार आहे. पुणे-बंगळुरू महामार्ग, पुणे-नाशिक महामार्ग, पुणे-मुंबई महामार्ग, पुणे-सोलापूर महामार्ग, पुणे-अहमदनगर महामार्ग, पुणे-सासवड-पालखी मार्ग याचा समावेश आहे.
रेडीरेकनरच्या पाच पट मोबदला

मावळ तालुक्यातील उर्से गावातील गट नंबर 393/3 मधील 1 हेक्टर 0548 आर जमीन रिंगरोडसाठी संमतीदर्शक निवाड्याद्वारे संपादित करण्यात आली. यासाठी संबंधित शेतकर्‍याला तब्बल 5 कोटी 65 लाख रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे. या गावात एकरी 2 कोटी 80 लाख रुपये मोबदला देण्यात आला. रेडीरेकनर दराच्या पाच पट अधिक दरानुसार सर्व बाधित शेतकर्‍यांना मोबदला देण्यात येणार आहे.

असा होणार रिंगरोड
एकूण लांबी : 173 किलोमीटर
रिंगरोड पश्चिम आणि पूर्व असे दोन टप्प्यात होणार
रिंगरोडसाठी तब्बल 1554.64 हेक्टर जमीन संपादित करणार
एकूण खर्चाला मंजुरी : 26831 कोटी रुपये
रिंगरोडमुळे पुणे शहराचे प्रदूषण 25 टक्क्यांनी कमी होणार

Back to top button