पुणे मेट्रोच्या 44.5 कि.मी.साठी हवेत 12 हजार कोटी; मेट्रोकडून पालिकेला आराखडा सादर | पुढारी

पुणे मेट्रोच्या 44.5 कि.मी.साठी हवेत 12 हजार कोटी; मेट्रोकडून पालिकेला आराखडा सादर

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दुसर्‍या टप्प्यातील सहा वेगवेगळ्या मार्गांवरील 44.5 कि.मी. मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) महामेट्रोने महानगरपालिकेला सादर केला आहे. हा सर्व मार्ग एलिव्हेटेड असून, त्यासाठी तब्बल 12 हजार कोटींचा खर्च येणार आहे. पुणे मेट्रो प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यातील स्वारगेट ते पिंपरी चिंचवड आणि वनाज- कोथरूड ते रामवाडी या दोन मार्गांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यानंतर शहरातील इतरही मार्गांवर मेट्रो प्रकल्प राबविण्याची मागणी होत होती. त्यानुसार शहरातील सहा वेगवेगळ्या मार्गांवरील 44.5 कि.मी.चा मेट्रो आणि एचसीएमटीआरच्या 36 कि.मी. मार्गिकेवरील नियो मेट्रो असा एकूण 82.5 कि.मी.चा आराखडा तयार करण्याचे आदेश तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महामेट्रोला दिले होते.

त्यानुसार, महामेट्रोने एचसीएमटीआर वगळता 44.5 कि.मी.चा मेट्रोचा आराखडा तयार केला आहे. नुकताच हा आराखडा महापालिकेला सादर केला असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय अध्यक्ष ब्रिजेश दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे सर्व मार्ग जमिनीवरील (एलिव्हेटेड) असून त्यासाठी 12 हजार 15 कोटींचा खर्च येणार आहे. एचसीएमटीआरचा 36 कि.मी.चा नियो मेट्रोचा आराखडाही ऑगस्टअखेरपर्यंत महापालिकेला सादर केला जाईल, असे दीक्षित यांनी सांगितले.

वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली
या दोन्हीही विस्तारीत मार्गिका असून त्यासाठी 3 हजार 357 कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. यामधील वनाज ते चांदणी चौक या मार्गांचे अंतर 1.12 कि.मी. असून त्यामध्ये कोथरूड बसस्टॉप व चांदणी चौक हे दोन स्टेशन प्रस्तावित आहेत. तर रामवाडी ते वाघोली या मार्गिकेचे अंतर 11.63 कि.मी. इतके असून त्यामध्ये विमाननगर, सोमनाथनगर, खराडी बायपास, तुळजाभवानी, उबाळेनगर, अप्पर खराडी रोड, वाघेश्वर मंदिर, वाघोली, सिध्दार्थनगर, बकोरी फाटा, विठ्ठलवाडी अशी एकूण 11 स्टेशन्स आहेत.

– खडकवासला- स्वारगेट- हडपसर- खराडी—-
खडकवासला ते थेट खराडी अशा पध्दतीने या मार्गाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या मार्गाचे एकूण अंतर 25.65 कि.मी. इतके असून त्यावर एकूण 22 स्टेशन आहेत. यामध्ये खडकवासला, दळवीवस्ती, नांदेड सिटी, धायरी फाटा, माणिकबाग, हिंगणे चौक, राजाराम ब्रिज, देशपांडे उद्यान, दांडेकर पूल, स्वारगेट, सेव्हन लव्हज चौक, पुणे कँटोन्मेंट बोर्ड कार्यालय, रेस कोर्स, फातिमानगर, रामटेकडी, हडपसर, मगरपट्टा दक्षिण, मगरपट्टा मुख्य, मगरपट्टा उत्तर, हडपसर रेल्वेस्टेशन, साईनाथनगर, खराडी चौक असे स्टेशन आहेत. ही सर्व एकत्रित मार्गिका आणि एसएनडीटी ते वारजे या 6 कि.मी. मार्गाचा एकत्रित खर्च 8 हजार 658 कोटी इतका अपेक्षित धरण्यात आला आहे.

– एसएनडीटी ते वारजे –
या मार्गाची एकूण लांबी 6 कि.मी. इतकी असून त्यावर एकूण 6 स्टेशन असणार आहेत. यामध्ये पौडफाटा, कर्वे पुतळा, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, दौलतनगर या स्टेशनचा समावेशा आहे.

असा आहे मेट्रोचा आराखडा
वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली
खडकवासला- स्वारगेट- हडपसर- खराडी
एसएनडीटी ते वारजे

Back to top button