पुणे : हवेलीत ‘प्लॉटिंग’ला मुद्रांकचे ग्रहण | पुढारी

पुणे : हवेलीत ‘प्लॉटिंग’ला मुद्रांकचे ग्रहण

लोणी काळभोर, सीताराम लांडगे : नोंदणी व मुद्रांक विभागाचे काही उपनिबंधक एका गुंठ्यासाठी तब्बल पन्नास हजार रुपयांची पूर्तता केली, तरच दस्त नोंदणी करत आहेत. यामुळे हवेली तालुक्यातील भूमिपुत्रांच्या खिशावर उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी खुलेआम डल्ला मारत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

हवेली तालुक्यात शेतीऐवजी प्लॉट विक्रीच्या व्यवसायात भूमिपुत्र उतरले आहेत. कोरोनाच्या संकटातून बाहेर येत असतानाच त्यांना पीएमआरडीएच्या कारवाईसह महसूल विभागाने दणका दिला होता. त्यानंतर आता कुठे त्यांचा व्यवसाय सुरळीत होत असताना मुद्रांक विभागाकडून सध्या त्यांना फटका बसत आहे.

हवेली तालुका हा पुणे शहराच्या चारही बाजूने विखुरलेल्या आहे. पूर्वी असलेला शेती व्यवसाय काही प्रमाणात शिल्लक आहे. शेती करण्याऐवजी भूमिपुत्रांनी स्वत:च्या शेतात प्लॉट विक्रीचा व्यवसाय सुरू केला. पूर्वी या व्यवसायात बड्या भांडवलदारांची मक्तेदारी होती. भूमिपुत्रांनी ती मोडीत काढली आहे. कोरोना संकटातून बाहेर पडून हा व्यावसायिक उभारी घेत असतानाच पीएमआरडीएचे ग्रहण लागले, तसेच महसूलचीही कारवाई झाली. यानंतर आता त्यांचा व्यवसाय सुरळीत होत आहे. मात्र, नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कार्यालयातील काही उपनिबंधक भूमिपुत्रांकडून प्लॉट विक्रीचे दस्त नोंदविण्यासाठी प्रत्येक गुंठ्यासाठी पन्नास हजारांची मागणी करत आहेत. पैसे मिळाल्यानंतर दस्त नोंदणी केली जात असल्याचे या व्यावसायिकांनी सांगितले.

कोणाकडे तक्रार करायची करा

याबाबत संबंधित उपनिबंधकांना जाब विचारला असता, कोणाकडे तक्रार करायची ती बिनदिक्कतपणे करा, अशी अरेरावीची उत्तरे देण्यात येत असल्याचे भूमिपुत्रांनी सांगितले. याबाबत राज्याचे मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांच्याकडेही तक्रार करण्यात आली आहे.

महानिरीक्षकांकडे अहवाल पाठविणार

पुणे जिल्ह्याचे मुद्रांक व नोंदणी निबंधक पारखे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, गुरुवारी संबंधित सहनिबंधक कार्यालयातील तपासणी केली जाणार आहे व तपासाअंती अहवाल नोंदणी महानिरीक्षक यांच्याकडे पाठवून योग्य ती कारवाई केली जाईल.

Back to top button