बाणेर : सुसखिंडीतील पूल कोंडीतून स्वातंत्र्य देणार? | पुढारी

बाणेर : सुसखिंडीतील पूल कोंडीतून स्वातंत्र्य देणार?

बाणेर; पुढारी वृत्तसेवा: सुसखिंडीत महामार्गावर असलेल्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, उर्वरित काम लवकर पूर्ण करून स्वातंत्र्य दिनानिमित्त या पुलाचे लोकार्पण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे महापालिका अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे. स्वातंत्र्यदिनापर्यंत हा पूल खुला केल्यास या परिसरातील नागरिकांना या ठिकाणी होणार्‍या वाहतूक कोंडीतून स्वातंत्र्य मिळणार का? तसेच, पुलाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पाषाण-सुस या गावांना महामार्गावर जोडणारा पूल पूर्ण होणे, हा वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या दृष्टिकोनातून या पुलाच्या कामासंदर्भात वारंवार आवाज उठवले गेले, आंदोलन केले गेले. काम सुरू करण्यापूर्वी तर दोन ते तीन वेळा भूमिपूजनही करण्यात आले. भूमिपूजन होऊनदेखील काही महिने कामही सुरू झाले नाही. परंतु, अखेर हा पूल पूर्णत्वालाच आला आहे. त्याची थोडीफार राहिलेली कामे उरकण्यासाठी प्रशासनाची लगबग सुरू आहे.

स्वातंत्र्यदिना दिवशी उद्घाटन करण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर कामे सुरू असून, हे उद्दिष्ट कितपत पूर्ण होणार, हे काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. मात्र, हा पूल उद्घाटन व श्रेय वादाच्या राजकारणात अडकता कामा नये, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहेत. वर्कऑर्डरनुसार 2020 साली सुरू करण्यात आलेल्या पुलाचे काम 12 ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण करावयाचे आहे. त्यानुसार काम सुरू असले, तरीही या ठिकाणी वारंवार भाजप व राष्ट्रवादीमध्ये श्रेयवादाची लढाई पाहावयास मिळाली आहे.

हा पूल पूर्ण झाल्यावर याचे उद्घाटनही दोन वेळा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकंदरीतच स्वातंत्र्यदिना दिवशी हा पूल खुला केल्यास नागरिकांना, अधिकार्‍यांना एक वेगळाच आनंद मिळणार असल्याचे लक्षात येत आहे. याबाबत कार्यकारी अभियंता अजय वायसे यांनी सांगितले, की सुसखिंडीतील 490 मीटर लांबी व 17 मीटर रुंदीचा हा पूल बांधून तयार असून, शिल्लक किरकोळ काम राहिले आहे. शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू आहेत. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापर्यंत कामे पूर्ण करून पूल नागरिकांसाठी खुला करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Back to top button