पुणे : डेंग्यूचा डंख खोल! आरोग्य विभाग सतर्क; हलगर्जीमुळे 1600 जणांना नोटिसा | पुढारी

पुणे : डेंग्यूचा डंख खोल! आरोग्य विभाग सतर्क; हलगर्जीमुळे 1600 जणांना नोटिसा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहरात कोरोनाचा आलेख उतरत असताना स्वाईन फ्लू आणि डेंग्यूने मात्र चिंता वाढवली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे प्रमाण वाढत असल्याने महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. आतापर्यंत 1600 नागरिकांना हलगर्जीपणा केल्याबद्दल नोटीस पाठविण्यात आली असून, 1 लाख 7 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहेत. शहरात जून महिन्यात डेंग्यूचे 17 रुग्ण आढळून आले होते. जुलै महिन्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 62 इतकी नोंदवली गेली. ऑगस्टमध्ये पहिल्या आठ दिवसांमध्ये 8 रुग्ण सापडले आहेत.

सध्या सततच्या पावसामुळे थंडी, ताप, सर्दीचे रुग्ण वाढत आहेत. बर्‍याच रुग्णांमध्ये डेंग्यूचे निदान होत आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठ दिवसांत डेंग्यूचे 251 संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 8 रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने प्रत्येक क्षेत्रिय कार्यालय पातळीवर स्वतंत्र पथक तयार केले आहे. आतापर्यंत 1,634 जणांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत 1,698 संशयित रुग्ण आढळून आले. यापैकी 213 जणांमध्ये डेंग्यूचे निदान झाले आहे.

डेंग्यूचा रुग्ण आढळलेल्या परिसरातील घरांची तपासणी करण्यात येत आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पावसाळ्यात नागरिकांनी घरात, घरावर आणि परिसरात खोलगट वस्तूंमध्ये पाणी साठून डासांची पैदास होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, असे आवाहन डॉ. संजीव वावरे यांनी केले आहे.

डेंग्यूची आकडेवारी
महिना संशयित पॉझिटिव्ह संख्या
जानेवारी 160 16
फेब्रुवारी 117 28
मार्च 128 22
एप्रिल 84 42
मे 58 18
जून 154 17
जुलै 746 62
ऑगस्ट 251 8
(स्तोत्र : पुणे महापालिका, आरोग्य विभाग)

39 हजारांचा दंड वसूल
डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला असून जुलै महिन्यात 971 नागरिकांना नोटिसा पाठवण्यात आल्या असून, 39 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 189 नोटिसा पाठवण्यात आल्या असून, 38 हजार 800 रुपयांचा दंड असा वसूल करण्यात आला आहे.

प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये 15 ते 20 बि—डिंग स्पॉट सापडत आहेत. ते नष्ट करून औषध फवारणी करण्यात येत आहे. महापालिकेने क्षेत्रिय कार्यालय स्तरावर पथके स्थापन करून डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत असलेल्या ठिकाणचे सर्वेक्षण सुरू केले आहे.

                                – डॉ. संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

Back to top button