विकेंडमुळे पुणे-सातारा रस्ता जाम; खेड शिवापूर टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा | पुढारी

विकेंडमुळे पुणे-सातारा रस्ता जाम; खेड शिवापूर टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे-सातारा रस्ता विकेंडमुळे रविवारी (दि. 7) दिवसभर वाहनांच्या कोंडीने जाम झाला होता. त्यामुळे वाहनचालकांना तासन् तास कोंडीमध्ये अडकून पडावे लागले. विशेष करून खेड शिवापूर टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

या परिसरात झाली कोंडी…
पुणे-सातारा रस्त्यावर पुण्याहून सातार्‍याच्या दिशेने जाताना भारती विद्यापीठ, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय ते कात्रजदरम्यान कोंडी झाली होती. तेथून पुढेसुद्धा कात्रज घाट ओलांडेपर्यंत शिंदेवाडीनजीक कोंडी झाली होती. तेथून पुढे खेड शिवापूर फाटा ते टोल नाक्यापर्यंत कोंडी झाली होती. टोल नाका ओलांडल्यावर वरवे आणि नसरापूर फाटा परिसरात कोंडीचे चित्र दिसले. यानंतर प्रतिबालाजी देवाच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या वाहनांची कापूरहोळ परिसरातदेखील प्रचंड कोंडी झाली होती. त्यानंतर तेथून पुढे सातार्‍यापर्यंत पर्यटकांना ठिकठिकाणी कोंडीचा त्रास सहन करावा लागला. तसेच, सातार्‍याहून पुण्याकडे येताना सर्वच ठिकाणी वाहनांची मोठी गर्दी झाली होती. यात विशेष करून खेड शिवापूर टोल नाका परिसरात जास्त कोंडी झाल्याचे दिसले.

पुणेकरांना टोल फ्री करावा…
पूर्वी खेड शिवापूर टोलनाका प्रशासनाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांच्या वाहनांना टोल फ्री केला होता. त्यामुळे या भागातील वाहने पटकन टोलानाका क्रॉस करीत होती. त्यामुळे कोंडी होत नव्हती. मात्र, टोल नाका प्रशासनाने आता सर्वच गाड्यांकडून टोल वसुली सुरू केली आहे. त्यामुळे वाहनचालकांना रांगेत बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागत आहे. परिणामी, या परिसरात वाहतूक कोंडीचे चित्र दिसत आहे. या कारणामुळे टोलनाका प्रशासनाने पुन्हा पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहनांना टोल फ—ी करावे, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

Back to top button