पुणे : खोदाईच्या दुरुस्तीसाठी ‘स्थायी’त निविदा मंजूर | पुढारी

पुणे : खोदाईच्या दुरुस्तीसाठी ‘स्थायी’त निविदा मंजूर

पुणे; पुढारी वृत्तसेवा: विविध कामांसाठी व सेवा वाहिन्यांसाठी केलेल्या रस्तेखोदाईची दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेने निविदा काढल्या आहेत. या निविदांना आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. शहरातील विविध रस्त्यांवर समान पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी, मल:निसारण वाहिनी, गॅस वाहिनी, वीज आणि केबल आदींसाठी खोदाई करण्यात आली आहे. खोदाईची कामे झाल्यानंतर योग्य प्रकारे रस्ते पूर्ववत करणे अपेक्षित असताना, ही कामे वरवरची मलमपट्टी केल्यासारखी करण्यात आली. त्यामुळे पहिल्या पावसातच शहरातील रस्त्यांची चाळण झाली.

यामध्ये शहरातील वाहतुकीचा वेग मंदावून वाहतूक कोंडीत वाढ झाली. त्यामुळे महापालिका प्रशासनावर टीकेची झोड उठली. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय, कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणार्‍या रस्त्यांवरील खड्डयांची दुरुस्ती करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाने या कामासाठी 54 लाख 75 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित धरला होता. प्रत्यक्षात 48 लाख 24 हजार रुपयांची निविदा काढण्यात आली. तर, कोथरूड -बावधन क्षेत्रीय कार्यालयाने या कामासाठी 42 लाख 67 हजार रुपयांच्या निविदेला मंजुरी दिली गेली. दोन्ही निविदा 30 टक्के कमी दराने आल्या आहेत. या निविदेनुसार रस्त्यांवरील खड्ड्यात मुरुम टाकने, सिमेंट काँक्रीटीकरण करणे, ब्लॉक बसविणे, मेनहोल समपातळीत बसविणे आदी कामे केली जाणार आहेत.

Back to top button