‘हर घर तिरंगा’साठी यंत्रणेचा वापर; काँग्रेसचे मुख्य प्रदेश प्रवक्ते अतुले लोंढे यांची घणाघाती टीका | पुढारी

‘हर घर तिरंगा’साठी यंत्रणेचा वापर; काँग्रेसचे मुख्य प्रदेश प्रवक्ते अतुले लोंढे यांची घणाघाती टीका

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भाजप सरकारी यंत्रणेचा वापर करून ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबवत आहे. स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करणे हा त्यांच्यासाठी इव्हेंट बनला आहे,’ अशी घणाघाती टीका काँग्रेसचे मुख्य प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली. अमृत महोत्सवानिमित्त काँग्रेसतर्फे आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी काँग्रेस भवन येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत लोंढे बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी तसेच पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

लोंढे म्हणाले, ‘आमच्यासाठी देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ही देशभक्ती आहे. तत्कालीन नेते, क्रांतिकारक व सामान्य जनतेने केलेल्या बलिदान, त्यागाच्या भावनांचा गौरव आहे,’ असे स्वातंत्र्य संग्रामात काँग्रेसचे अतुलनीय योगदान आहे. आमच्या तत्कालीन नेत्यांनी चळवळीत वैयक्तिक स्तरावर प्रचंड त्याग केला. लोकशाही टिकविली, नागरिकांचे अधिकार अबाधित ठेवले, मात्र सध्या लोकशाहीचा गळा घोटण्याचे आणि इडी-सीबीआयच्या माध्यमातून अधिकारांवर गदा आणले जात आहे. लोकशाहीतील संस्थासंपवण्याचे काम सुरू आहे. ‘हर घर तिंरगा’ ही मोहीम चांगलीच आहे, मात्र त्यासाठी सरकारी यंत्रणेचा बेसुमार वापर होत आहे.

अमृत महोत्सवानिमित्त राबविले जाणारे कार्यक्रम
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शहर-जिल्हा काँग्रेसच्या वतीने देशातील द्वेषपूर्ण राजकारणाच्या विरोधात 7 ऑगस्ट (रविवारी) रोजी सकाळी 7.30 वा मैत्र सद्भाव सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. ही रॅली काँग्रेस भवन – शनिवार वाडा – शिवाजी रोड – स्वारगेट चौक – सारसबाग – टिळक रोड मार्गे गुडलक चौक येथे समाप्त होणार आहे. त्यानंतर क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येस सोमवारी (8 ऑगस्ट) सायं. 6.30 वा., काँग्रेस भवन येथून क्रांतिज्योत यात्रा काढण्यात येणार आहे.

ही ज्योत यात्रा काँग्रेस भवन – मनपा भवन – शनिवार वाडा – लाल महाल – हुतात्मा कर्णिक स्मारक – बेलबाग चौक – हुतात्मा बाबू गेनू स्तंभ मंडई अशी निघणार आहे. त्यानंतर 14 ऑगस्ट रोजी शहरात पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सहभागी होणार आहेत. याशिवाय छायाचित्र प्रदर्शन, ध्वजवंदन, देशभक्तीपर चित्रपट दाखवणे आदी उपक्रम राबविले जाणार आहेत.

Back to top button