पुणे : पोलिसांना चकवा देणारा तितल्या जेरबंद; फायरिंगसह दोन खुनांच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात होता फरारी | पुढारी

पुणे : पोलिसांना चकवा देणारा तितल्या जेरबंद; फायरिंगसह दोन खुनांच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात होता फरारी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: फायरिंगसह दोन खुनांच्या प्रयत्नातील गुन्ह्यात गेल्या सहा महिन्यांपासून फरार असलेल्या सराइताला गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने जेरबंद केले. उत्तमनगर येथील फायरिंगच्या गुन्ह्यात पोलिस त्याच्या मागावर होते. आरोपीला वारजे पूल परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. आकाश ऊर्फ तितल्या अनिल मुलगे (वय 21, रा. वारजे; मूळ रा. गुलबर्गा) असे अटक केलेल्या सराइताचे नाव आहे. मुलगे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-1 चे सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील हे पथकातील कर्मचार्‍यांसह हद्दीत गस्त घालत होते.

त्या वेळी वारजे ब्रिजजवळ संशयित आरोपी हातामध्ये लोखंडी कोयता घेऊन थांबल्याची माहिती पथकाला मिळाली. यानुसार पथकाने सापळा रचून मुलगे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत वारजे-माळवाडी आणि उत्तमनगर पोलिस स्टेशनकडील फायरिंग आणि खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यामध्ये तो फरार असल्याचे समोर आले. त्याच्याजवळ एक लोखंडी कोयता मिळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करून वारजे-माळवाडी पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम, सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, कर्मचारी बाळू गायकवाड, धनंजय ताजणे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Back to top button