करंजी : आरक्षणावरून इच्छुकांमध्ये धाकधूक | पुढारी

करंजी : आरक्षणावरून इच्छुकांमध्ये धाकधूक

करंजी : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाले. यानंतर लगेच प्रत्येक गटातील व गणातील इच्छुकांनी निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे. जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण पुन्हा काढण्यात येणार असल्याच्या हालचाली सुरू झाल्याने इच्छुकांची पुन्हा धाकधूक वाढली. आता आरक्षणाचे काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे. पाथर्डी तालुक्यातील मिरी गट सर्वसाधारण व्यक्तीसाठी खुला झाला असून, तिसगाव जिल्हा परिषद गटही सर्वसाधारणसाठी खुला आहे. त्यामुळे या दोनही गटात इच्छुकांची संख्याही अधिक आहे.

इच्छुक सध्या छोट्या-मोठ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनसंपर्क अभियान राबवित आहेत. करंजी पंचायत समिती गण सर्वसाधारण, तर मिरी नागरिकांचा मागासवर्ग, तिसगाव नागरिकांचा मागासवर्ग,माळीबाभुळगाव सर्वसाधारण आरक्षण असल्याने या सर्व गणात युवा उमेदवार प्रामुख्याने पुढे आलेले आहेत. ही सर्व युवामंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या प्रचारही सुरू केला; परंतु जिल्हाधिकार्‍यांकडून फेर आरक्षण काढण्याचे संकेत मिळताच या सर्व इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. त्यांचा; मात्र मोठा भ्रमनिरास झाल्याचे दिसून येतो. खरच फेर आरक्षण निघणार का? निघाले, तर आपल्या सोयीचे निघेल का? याची धाकधूक उत्साही उमेदवारांना लागली आहे. फेर आरक्षण पडले, तर राखीव गट होऊन आपल्याला संधी मिळेल का? असे चिंता वाढली आहे.

Back to top button