पुणे : पेट्रोलपंप डिलरशिप पडली 42 लाखांना | पुढारी

पुणे : पेट्रोलपंप डिलरशिप पडली 42 लाखांना

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पेट्रोल पंपाची डिलरशिप देण्याच्या बहाण्याने कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून एका व्यक्तीला सायबर चोरट्यांनी तब्बल 42 लाख 25 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातला. ही घटना 4 ते 17 ऑगस्ट 2021 या कालावधीत घडली. याप्रकरणी माण-हिंजवडी फेज एक येथील 50 वर्षीय व्यक्तीने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार इरफान अमजअली (रा. पश्चिम बंगाल), शर्मिला कुमारी (रा. बिहार), रीना कुमारी (रा. टी चॅपल रोड, बांद्रा) मोबाईलधारक यादव अशा चौघांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी एका खासगी कंपनीत नोकरी करतात. त्यांच्याकडे स्वतःची पेट्रोलपंप सुरू करण्याएवढी मोकळी जागा आहे. त्यांना ऑनलाइन माध्यमातून पेट्रोलपंपाच्या जाहिरातीची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तेथे संपर्क साधला. प्रत्यक्षात तो सायबर चोरट्यांचा सापळा होता. फिर्यादी अलगद त्यांच्या जाळ्यात अडकले.

आरोपींनी फिर्यादींना आयओएल पेट्रोलपंपाची डिलरशीप देण्याचे प्रलोभन दाखवून, कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादींकडून वेळोवेळी 42 लाख 25 हजार रुपये ऑनलाइन घेतले. दरम्यान, पैसे भरूनदेखील कोणतीही डिलरशीप मिळत नाही, हे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने वारंवार त्यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

Back to top button