पुणे : गंगाधाम चौकातील उड्डाणपुलास मंजुरी; 24 मीटरचा रस्ताही होणार | पुढारी

पुणे : गंगाधाम चौकातील उड्डाणपुलास मंजुरी; 24 मीटरचा रस्ताही होणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: गंगाधाम चौकात उड्डाणपुलासह भुयारी मार्ग (ग्रेडसेपरेटर) आणि 24 मीटरचा रस्ता करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीत शुक्रवारी मंजूर करण्यात आला. क्रेडिट नोटच्या माध्यमातून होणारा हा शहरातील पहिला प्रकल्प ठरणार आहे. महापालिकेच्या मुख्य सभेत येथील 24 मीटर रस्ताआखणीचा प्रस्ताव वादग्रस्तही ठरला होता. बिबवेवाडी, मार्केट यार्ड आणि कोंढवा परिसराकडे जाणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि कोंढवा गंगाधाम चौकात उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग बांधला जाणार
असल्याचे निश्चित झाले आहे.

कात्रजकडून बिबवेवाडीकडे जाणार्‍या वाहनांसाठी स्वतंत्र 24 मीटर रुंदीचा रस्ता केला जाणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या माध्यमातून प्रशासक विक्रम कुमार यांच्याकडे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. त्याला मंजुरी देण्यात आल्याचे कुमार
यांनी सांगितले. दरम्यान, 24 मीटर रुंदीचा रस्ता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 च्या कलम 205 अन्वये आखण्यासंबंधीचा प्रस्ताव 24 डिसेंबर 2021 रोजी महापालिकेच्या सभागृहात मंजूर झाला होता.

मात्र, हा रस्ता एका बांधकाम व्यावसायिकासाठी करण्यात येत असल्याचा आरोप त्या वेळी झाले होते. मात्र, तत्कालीन सत्ताधारी भाजपने बहुमताने हा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यानंतर या सर्व कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. क्रेडिट नोटच्या माध्यमातून होणारा हा प्रकल्प 92 कोटी 32 लाख 14 हजार 166 रुपयांचा आहे. त्यासाठी महापालिकेला थेट पैसे द्यावे लागणार नाहीत, तर बांधकाम शुल्क, खोदाई शुल्क, मिळकतकर यासह इतर शुल्कातून ठेकेदार हे पैसे वळते करून घेईल.

उड्डाणपूल
बिबवेवाडीकडून कोंढव्याच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यावर 520 मीटर लांबीचा व 16 मीटर रुंदीचा उड्डाणपूल बांधला जाणार आहे. शहरातील हा सर्वांत कमी लांबीचा उड्डाणपूल असेल, असेही सांगण्यात येत आहे.

भुयारी मार्ग
या चौकात जो भुयारी मार्ग होणार आहे, तो आईमाता मंदिर ते मार्केट यार्ड यादरम्यान 460 मीटर लांबीचा आणि 13.50 मीटर रुंदीचा असेल. या भुयारी मार्गातून मार्केट यार्डातील अवजड ट्रक देखील जाऊ शकतील, अशा पध्दतीचे नियोजन करण्यात आले आहे.

24 मीटर रस्ता
आईमाता मंदिराकडून बिबवेवाडीच्या दिशेने झारा कॉम्प्लेक्स यादरम्यान स्वतंत्र 24 मीटरचा रस्ता केला जाणार आहे. या प्रकल्पात सर्वांत आधी याच रस्त्याचे काम सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पीपीपी क्रेडिट नोट
हा प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या धर्तीवर डेव्हलपमेंट क्रेडिट नोट या मोबदल्यात हा निखिल कन्स्ट्रक्शन ग्रुपतर्फे करण्यात येणार आहे.

Back to top button