Trend story : चहाचा आस्वाद घेत निवांत ऐका संगीत.. सोबत गीतांची मैफल | पुढारी

Trend story : चहाचा आस्वाद घेत निवांत ऐका संगीत.. सोबत गीतांची मैफल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कॉफी-चहाचा घोट घेत लाइव्ह वादनाची किंवा गायनाची मैफल ऐकायला मिळाली तर… हे ऐकल्यावर आनंद होईल… हे खरे आहे… सध्या पुण्यात विविध कलांवर आधारित आर्ट कॅफेची संकल्पना रुजत असून, संगीत, चित्रकला, नृत्य, बॉलिवूड म्युझिक, कविता, वाद्य, अशा विविध थीमवर आधारित आर्ट कॅफेची संख्या पुण्यात वाढली अहे. विशेष म्हणजे, आर्ट कॅफेमध्ये युवा कलाकारांना कला सादरीकरणासाठीची संधी मिळत असून, सायंकाळच्या वेळेस कॅफेमध्ये युवा कलाकारांचे कला सादरीकरणाचे कार्यक्रम रंगत आहेत.

कलेचा आनंद घेण्यासह तरुणाईला चहा-कॉफी व विविध खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेता येत आहे. हे कॅफे तरुणाईसाठी हक्काचा कट्टा बनले आहेत. गेल्या चार ते पाच वर्षांत पुण्यामध्ये विविध संकल्पनांवर आधारित कॅफेची संख्या वाढली आहे. त्यात आता आर्ट कॅफेलाही तरुणाईचा प्रतिसाद मिळत असून, अंदाजे 40 ते 50 आर्ट कॅफे सुरू आहेत. कोरेगाव पार्क, कॅम्प परिसर, डेक्कन, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, जंगली महाराज रस्ता, हिंजवडी, कर्वेनगर, प्रभात रस्ता, विमाननगर, खराडी, औंध, बाणेर, बावधन, भांडारकर रस्ता, कोथरूड आदी ठिकाणी असे आर्ट कॅफे पाहायला मिळतील. याविषयी कॅफेचालक राज लोखंडे म्हणाले, आम्ही चित्रकलेवर आधारित कॅफे सुरू केले असून, त्याला चांगला प्रतिसाद आहे. चित्रकला महाविद्यालय कॅफेजवळ असल्याने कॅफेची थीम चित्रकला निवडली. त्यामुळे या थीमप्रमाणे युवा चित्रकार कॅफेत येऊन चित्र काढतात, चित्रकलेच्या दुनियेत रमतात.

असे आहे आर्ट कॅफेचे स्वरूप…

चहा-कॉफीचा घोट घेत बॅकग्राउंडला संगीत ऐकत निवांत क्षण घालविण्याचे निमित्त देणार्‍या कॅफेमध्ये आपण गेलाच असाल. परंतु, यापलीकडे विविध कलांवर आणि कलेचे सादरीकरण करता यावे, यासाठी व्यासपीठ निर्माण करणारे कॅफे म्हणजे आर्ट कॅफे. या कॅफेमध्ये विविध कलांवर आधारित इंटेरिअर डिझाइन आणि सजावट केलेली दिसेल. उदा. : संगीतावर आधारित कॅफे असेल, तर तिथे विविध संगीतकारांची पोस्टर्स, फोटोफ्रेम्स, चित्रे, आर्टिफिशिअल वस्तू अन् तशीच कॅफेची अनोखी सजावट केलेली पाहायला मिळेल. याशिवाय कॅफेमध्ये कलाकारांना सादरीकरणासाठी छोटेखानी व्यासपीठही असते आणि त्याला अनुसरून बैठकव्यवस्थाही पाहायला मिळते.

पुण्यात गेल्या काही वर्षांत कॅफेची संख्या वाढली आहे. त्यातील बरेच आर्ट कॅफे या संकल्पनेवर आधारित आहेत. कवितांपासून ते नृत्यापर्यंतच्या संकल्पनेवर कॅफेची निर्मिती झाली आहे. कॅफेमध्ये कला सादरीकरणासाठी कलाकारांना व्यासपीठही दिले जात आहे. याशिवाय चहा-कॉफीसह भारतीय, मेक्सिकन, इटालियन खाद्यपदार्थही कॅफेमध्ये मिळत आहेत.

– किशोर सरपोतदार, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट्स अँड केटरिंग असोसिएशन

हेही वाचा

Back to top button