बारामती तालुक्याला पावसाने झोडपले | पुढारी

बारामती तालुक्याला पावसाने झोडपले

बारामती : पुढारी वृत्तसेवा : मुसळधार पावसाने बुधवारी (दि. 3) बारामती तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. तालुक्यात सोनगाव येथे सर्वाधिक 98 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे खरिपातील पिकांना जीवदान मिळाले असून, दमदार पावसाची शेतकर्‍यांची अपेक्षा पूर्णत्वाला गेली आहे. गेल्या आठवड्यात तालुक्यात संततधार पाऊस सुरू होता. त्या पावसाने फारसा फायदा होण्याऐवजी जनजीवन विस्कळीत झाले होते. शेतीकामांवर विपरित परिणाम झाला होता. दमदार पाऊस व्हावा, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना होती. ती बुधवारी रात्री पूर्ण झाली.

बुधवारी रात्री नऊच्या सुमारास तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. सुमारे दोन तासांहून अधिक काळ जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे शेतातील पिकांना त्याचा मोठा फायदा झाला. तालुक्यात यंदा उसाच्या आडसाली लागणी मोठ्या प्रमाणावर झाल्या आहेत. त्यांची उगवण चांगली झाली आहे. निरा कालव्याचे, नदीचे पाणी सध्या उपलब्ध असले तरी पावसाची गरज होती. ती या निमित्ताने पूर्ण झाली. उसाच्या सर्‍या पाण्याने भरून गेल्याचे चित्र गुरुवारी सकाळी पाहायला मिळाले.

बाजरीसह सोयाबीन, खरिपातील चारा पिके व कडधान्यांना या पावसाचा मोठा फायदा होणार आहे. मुसळधार पावसाबरोबरच सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट यामुळे बुधवारी रात्री भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. परंतु, त्यातही मुसळधार पावसाने बरसात केल्याने भीतीची जागा समाधानाने घेतली. या पावसामुळे खरिपातील पिके आणखी तरारतील, अशी अपेक्षा शेतकर्‍यांनी व्यक्त केली. तरकारी पिकांचे मोठ्या पावसामुळे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आगामी काळात तरकारीचे दर वाढण्याची चिन्हे आहेत. बागायती भागात पावसाचा जोर अधिक होता. जिरायती भागात मोरगावपासून अलीकडील पट्ट्यात चांगला पाऊस झाला. सुपे परिसरात पाऊस झाला असला तरी तेथे आणखी मोठ्या पावसाची गरज व्यक्त केली जात आहे.

बुधवारी झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
बारामती – 23, उंडवडी कडेपठार – 20, सुपा- 9, लोणी भापकर – 27, माळेगाव कॉलनी- 21, वडगाव निंबाळकर 85, पणदरे – 16, मोरगाव – 26, लाटे – 3, बरहाणपूर – 19, सोमेश्वर कारखाना – 47, होळ-आठ फाटा – 44, माळेगाव कारखाना – 10, मानाजीनगर – 9, चांदगुडेवाडी – 38, काटेवाडी – 25, अंजनगाव – 14, जळगाव सुपे – 45, कृषी विज्ञान केंद्र – 25, सोनगाव – 98, कटफळ – 29, सायंबाचीवाडी – 10, चौधरवाडी – 14, नारोळी – 22, कारहाटी- 19, गाडीखेल- 35, जराडवाडी – 13, पळशी – 19, सावंतवाडी – 13, मुर्टी – 25, मोढळे – 21

Back to top button