बारामतीत फडकणार 75 फुटांचा ध्वज | पुढारी

बारामतीत फडकणार 75 फुटांचा ध्वज

बारामती; पुढारी वृत्तसेवा: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बारामती तालुक्यात ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत बारामतीत मुख्यालयी 75 फूट उंचीचा ध्वज फडकवला जाणार आहे.
स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सवानिमित्त ” हर घर तिरंगा” उपक्रमाच्या तयारीची बैठक बारामती तहसील कार्यालयात पार पडली. त्यात तहसीलदार पाटील यांनी ही माहिती दिली. सर्व शासकीय, तसेच निमशासकीय विभाग प्रमुख व खासगी आस्थापनांनी आपापल्या स्तरावर ”हर घर तिरंगा ”हा उपक्रम 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राबवून तालुक्यातील प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज लावण्यासाठी प्रयत्न करावेत.

राष्ट्रध्वज वाजवी किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावा. नागरिकांना राष्ट्रध्वज घरावर फडकविण्यासाठी प्रोत्साहित करावे. बारामती तालुक्याच्या मुख्यालयी 75 फूट उंच राष्ट्रध्वज उभारला जाणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य ते नियोजन करावे, असेही त्यांनी सूचित केले. या कार्यक्रमांतर्गत तालुकास्तरावरील शासकीय कार्यालयात वृक्षारोपण करण्यात यावे. तालुक्यातील पुरातत्त्वदृष्ट्या महत्त्वाची वारसास्थळे देखभालीसाठी ऐतिहासिक वारसा जपवणूक करणार्‍या संस्थांना दत्तक देण्यात यावीत.

शालेय, महाविद्यालय स्तरावरून विविध स्पर्धा, निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. शासकीय इमारतीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचे बोधचिन्ह लावावे. या निमित्ताने स्वच्छता मोहीम राबवावी. तालुक्याच्या मुख्यालयी संविधान स्तंभाची उभारणी करण्यात यावी व सर्व कुटुंबांनी या उपक्रमात सहभागी होऊन तिरंगा ध्वज आपल्या घरावर फडकवावा, असे आवाहन पाटील यांनी केले.

Back to top button