पुणे महापालिकेत जातील 166 नगरसेवक! 173 वरून 7 ने संख्या घटणार | पुढारी

पुणे महापालिकेत जातील 166 नगरसेवक! 173 वरून 7 ने संख्या घटणार

पुणे : महापालिकांसाठी लोकसंख्येच्या निकषानुसार सदस्यसंख्येत बदल करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे आता पुणे महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 166 होणार आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार ही संख्या 7 ने घटणार असून, 2017 च्या तुलनेत मात्र 2 ने वाढणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील 18 महापालिकांमध्ये तीन सदस्यीय अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. असे असतानाच बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2017 च्या महापालिका निवडणुकीप्रमाणे पुन्हा चार सदस्यीय पद्धतीने प्रभाग रचना करण्याचा आणि 2011 च्या लोकसंख्येच्या निकषानुसार नगरसेवक संख्या निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार 2011 च्या जनगणनेनुसार पुणे शहराची लोकसंख्या समाविष्ट 34 गावांसह 35 लाख 56 हजार 824 इतकी आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार ज्या शहराची लोकसंख्या तीस लाखांपेक्षा अधिक आहे. तेथे नगरसेवकांची संख्या 161 ते 175 या दरम्यान असावी व 30 लाखांच्या पुढे प्रत्येक 1 लाख लोकसंख्येसाठी एक नगरसेवक असणार आहे. या निकषानुसार पुणे शहरात 166 इतकी नगरसेवकांची संख्या निश्चित होणार आहे.

दरम्यान, 2017 ला महापालिकेची नगरसेवक संख्या 162 होती. त्यात ऑ़क्टोबर 2017 ला झालेल्या 11 गावांच्या समावेशानंतर ही संख्या 2 वाढून 164 इतकी झाली होती. त्यानंतर आगामी पालिका निवडणुकीसाठी वाढलेली लोकसंख्या गृहीत धरून महाविकास आघाडी सरकारने नगरसेवकांच्या संख्येत बदल केला होता. त्यानुसार आगामी महापालिकेसाठी ही संख्या 173 इतकी झाली होती. आता शिंदे-फडणवीस सरकारच्या नव्या निर्णयानुसार ही संख्या 166 इतकी होईल, असे प्रशासकीय सुत्रांकडून सांगण्यात आले.

Back to top button